ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यात कडक निर्बंध लागु
प्रकाशन दिनांक : 06/01/2022
रुग्णांना गृह विलगीकरणात राहायचे असल्यास घरातील इतर सर्व सदस्यांचे लसीकरण बंधनकारक – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
- रुग्णालयांनी बेड्सची संख्या वाढवावी
- गर्दीच्या ठिकाणी राहणार कॅमेऱ्यांची नजर
- हुर्डापार्टी/फॉर्म हाऊसवर पूर्णपणे बंदी: उल्लंघन केल्यास पोलिस कारवाई
- मंगल कार्यालयातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मंगल कार्यालय व्यवस्थापणाची
- शासकीय/निमशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द
औरंगाबाद, दिनांक 05 (जिमाका) : सध्या जिल्ह्यात कोविडचे रुग्ण वाढत आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात कडक निर्बंध लावणे आवश्यक आहे. सध्याची वाढत जाणारी रुग्ण संख्या पाहता रुग्णालयांनी बेड्सची संख्या वाढविण्यावर भर द्यावा. रुग्णांना गृह विलगीरणात राहायचे असल्यास घरातील इतर सर्व सदस्यांचे लसीकरण बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील चव्हाण सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा टास्क फोर्स आणि शहरातील खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांची बैठक पार पडली. यावेळी मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, पोलिस अधिक्षक निमितकुमार गोयल, उपायुक्त डॉ. उज्जवला वनकर, वैद्यकीय अधिकारी पारस मंडलेचा, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी तसेच खाजगी रुग्णालयांचे डॉक्टर्स उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी यावेळी शहरातील सर्व रुग्णालयांतील उपलब्ध बेड्सचा आढावा घेतला तसेच ऑक्सिजनची संभाव्य मागणी लक्षात घेता सर्व ऑक्सिजन प्रकल्पाची देखील सविस्तर आढावा घेतला.
जिल्हाधिकारी म्हणाले की, जे रुग्ण गृह विलगीकरणात आहेत त्यांच्या घरातील इतर सदस्यांनी स्वत: होम क्वारंटाईन राहावे त्यांनी घराबाहेर पडू नये. सर्व रुग्णालयांनी रुग्णांची सर्जरी पूर्वी जशा इतर चाचण्या केल्या जातात तशाच प्रकारे कोविडची चाचणी देखील करण्याचे निर्देश दिले. वाढती रुग्णसंख्या पाहता गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याने हॉटेलमध्ये/ रिसॉर्ट्स मध्ये होणाऱ्या गर्दीचे चित्रिकरण करावे. लसीकरण केलेले नसेल तर पेट्रोल मिळणार नाही. सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्याना अपवादात्मक वैद्यकीय कारण वगळता रजा घेता येणार नाहीत. शहर आणि ग्रामीण भागातील लग्नामध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसिलदार, गट विकास अधिकारी यांनी मंगल कार्यालयांना नियमित भेटी देण्याचे निर्देश देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
चौकट:
शहराजवळील शेतामध्ये चालणाऱ्या हुरडापार्टीवर आजपासून पूर्णपणे निर्बंध असतील. एखाद्या ठिकाणी हुरडापार्टी सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास चालकावर पोलीस कारवाई करणार. शहराजवळील /शहराबाहेरील फार्म हाऊस/ रिसॉर्टवर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आजपासून फार्म हाऊस/ रिसॉर्ट पूर्णपणे बंद असतील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी सांगितले.
मंगल कार्यालय व्यवस्थापनाने आगामी लग्नाच्या booking तारखांची माहिती प्रशासनाला कळवावी. 50 पेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही याबाबत मंगल कार्यालय व्यवस्थापनाने प्रशासनाला लेखी द्यावे. नियमांचे उल्लंघन केल्यास पोलीस कारवाई करणार असल्याचे उपायुक्त उज्वला वनकर यांनी सांगितले.
कोविड नियमांचे पालन न करणाऱ्या 1875 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचे लायसन्सदेखील जप्त करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी सांगितले.