यशस्वी होण्यासाठी ज्ञान मिळवा, कष्ट करा – पालकमंत्री सुभाष देसाई
प्रकाशन दिनांक : 13/12/2021
साताऱ्यातील जिल्हा परिषद शाळेला भेट
औरंगाबाद, दिनांक 10 (जिमाका) : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी देशासाठी अनेक मिसाइल तयार केले. कोणतीही सुविधा नसलेल्या खेडे गावात डॉ.कलाम राहत असत. परंतु ज्ञान मिळविण्याची जिद्द आणि कष्ट करण्याची ताकद त्यांच्यात होती, म्हणून ते देशाचे राष्ट्रपती झाले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन् प्रत्येकाने जीवनात यशस्वी होण्यासाठी ज्ञान मिळवावे, कष्ट करावे, असा सल्ला उद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी विद्यार्थ्यांना दिला.
सातारा परिसरातील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेत मंत्री देसाई बोलत होते. यावेळी सर्वश्री आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट, राजेंद्र जंजाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे आदींची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री देसाई यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना ड्रेसचे, तर शेतकऱ्यांना सातबाराचेही वाटप करण्यात आले
पालकमंत्री देसाई म्हणाले, सातारा परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळांप्रमाणेच जिल्ह्यातील इतर शाळांनीही शाळेतील सुविधांचा फायदा घेऊन् विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत. या शाळेसाठी आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याची ग्वाही मंत्री देसाई यांनी दिली. जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वांगीन वाचनाला विद्यार्थ्यांनी प्राधान्य द्यावे. जेथून शक्य आहे, तिथून ज्ञानार्जन करावे. कष्ट करण्याची तयारी ठेवावी आणि आई-वडिलांना विसरू नये, शाळेचा लौकिक वाढविण्याची जिद्द ठेवावी, असेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री देसाई यांनी सांगितले.
आमदार शिरसाट यांनी शाळेतील सोयी सुविधांची माहिती दिली. शिवाय या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षणासाठी अधिकच्या चार वर्ग खोल्या, संगणक, लॅपटॉप उपलब्ध करून देण्याची मागणी केली. श्री. गटणे यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत शाळेत राबवित असलेल्या अभिनव प्रकल्पांबाबत सांगितले. शिक्षिका श्रीमती गाडेकर यांनी शाळेतील सोयी सुविधांबाबत माहिती दिली.
सातारा गावातील खंडोबा देवस्थानला ‘क’ दर्जा प्राप्त करून दिल्याबाबत नगरसेवक सिद्धार्थ शिरसाट, रमेश बाहुले आणि विशाल धुमाळ यांनी मंत्री देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.