बंद

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक संपन्न ओमायक्रॉनला रोखण्यासाठी पात्र नागरिकांनी तात्काळ लसीकरण करुन घ्यावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 10/12/2021

  • पात्र लाभार्थ्यांनी दुसरा डोस 15 डिसेंबरपर्यंत घ्यावा नसता दंडात्मक कारवाई
  • महाविद्यालय/खाजगी क्लासेस मधील शिक्षकांनी कोविड चाचणी करणे बंधनकारक
  • कोविडमुळे निधन पावणा-या मृतांच्या वारसांना तात्काळ साहाय्य देण्याचे निर्देश
  • Vaccination on Wheel & Vaccination on Demand अंतर्गत पथक स्थापन

औरंगाबाद, दिनांक 09   (जिमाका) : ओमायक्रॉन पासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे त्यामुळे पात्र नागरिकांनी तात्काळ लसीकरण करुन लसीकरण मोहिमेला प्रतिसाद द्यावा. जिल्ह्यातील जे नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत परंतु त्यांनी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही अशा नागरिकांनी 15 डिसेंबरपर्यंत दुसरा डोस पूर्ण करावा , अन्यथा शासकीय पर्याय वापरुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच महाविद्यालय/खाजगी क्लासेस मधील ज्या शिक्षकांनी कोविडच्या दोन्ही लसी घेतलेल्या आहेत त्या शिक्षकांनी महिन्यातून एकदा आणि ज्यांनी लस घेतलेली नाही अशा शिक्षकांनी प्रत्येक आठवड्याला कोविड चाचणी करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुनील चव्हाण यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती मीनाताई शेळके, महानगरपालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय, पोलिस उपायुक्त श्रीमती बनकर, निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. प्रदीप कुलकर्णी आदी अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की,  Omicron या विषाणुची प्रसारक्षमता लक्षात घेता त्याचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींचे प्रत्येक महिन्याला, लसीकरणाचा एक डोस घेतलेल्या व्यक्तींची प्रत्येक 15 दिवसाला व लसीकरणाची एकही मात्रा न घेतलेल्या व्यक्तींची प्रत्येक आठवड्याला RT-PCR तपासणी करण्यात यावी. शासनाच्या निर्देशांप्रमाणे कोविड-19 मध्ये मृत्यू झालेल्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची कार्यवाही तातडीने करावी. सर्व महाविद्यालयांनी त्यांचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे याबाबतची खात्री करावी. लसीचा किमान एक डोस न घेतलेल्या विद्यार्थी/शिक्षकांना तसेच दुसऱ्या डोससाठी पात्र असूनही दुसरा डोस घेतलेला नाही असे विद्यार्थी/शिक्षकांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

या बैठकीत घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय खालील प्रमाणे…

  • सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे कोणतेही फॉर्म (परीक्षा/विद्यावेतन/प्रवेश इ.) भरण्यापुर्वी त्यांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक लस घेतली असल्याबाबतची खात्री करावी. सर्व महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात कोविड-19 च्याअनुषंगाने Antigen/RT-PCR तपासणी करण्यात याव्यात. ज्या-ज्या ठिकाणी मोहिम स्वरुपात तपासणीचे कॅम्प आयोजीत केले असतील, त्या सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त पुरविण्यात यावा.
  • Vaccination on Wheel & Vaccination on Demand या मोहिमेअंतर्गत मोबाईल व्हॅन पथकांची स्थापना करण्यात येणार. हे पथक मागणीप्रमाणे घरोघरी जाऊन नागरिकांचे लसीकरण करणार.
  • कोविड-19 च्या अनुषंगाने कर्तव्य बजावत असलेल्या परंतु कोविड आजाराऐवजी इतर आजार व अपघाताने मृत्यू पावणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुध्दा विशेष आर्थिक सहाय्य करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार.
  • कोविड-19 च्या अनुषंगाने कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर संबंधित विभागप्रमुखांनी कसूर करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांचेवर योग्य ती कार्यवाही करावी.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक संपन्न ओमायक्रॉनला रोखण्यासाठी पात्र नागरिकांनी तात्काळ लसीकरण करुन घ्यावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण