परदेशी प्रवास करून आलेल्या प्रवाशांची माहिती कळवा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशन दिनांक : 30/11/2021
ओमिक्रॉन, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक
औरंगाबाद, दिनांक 29 (जिमाका) : सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये कोव्हिड-19 च्या ओमिक्रॉन या नवीन विषाणूचा प्रकार आढळून आला असून, सदर विषाणू हा अत्यंत घातक असून, त्याची प्रादूर्भाव क्षमता ही पूर्वीच्या विषाणूपेक्षा 500 % अधिक असल्याचे आढळून आले आहे. ओमिक्रॉन या विषाणूचा संसर्ग आपल्या देशात रोखण्यासाठी विमानाद्वारे येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत आजच्या बैठकीमध्ये जिल्हा प्रशासनाने आज पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
सध्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूचा प्रसार होण्याचा संभव लक्षात घेऊन मागच्या 20 दिवसांत परदेशातून प्रवास करून आलेल्या प्रवाशांची माहिती जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्ष ( दूरध्वनी 0240-2331077) आणि मनपाच्या कोरोना वॉर रूमला (दूरध्वनी 8956306007) कळविण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नागरिकांना केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात विमानाने येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या आणि घ्यावयाची खबरदारी या संदर्भात जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक निमित गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक डी.जी.साळवे, अतिरिक्त मनपा आयुक्त बी.बी. नेमाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, जिल्हा कोविड नियंत्रण कक्षाचे डॉ. विजयकुमार वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमरीन फातेमा यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, विमान प्रवास करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसचे दोन डोस घेणे आवश्यक आहे, अथवा 72 तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारकआहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कोरोना प्रतिबंधक लस घ्यायलाच हवी. विमान प्राधिकरणानेही कोरोना प्रतिबंधक लस बाबतची तपासणी करावी. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रवाशांबाबतच्या प्रवासाची माहिती विविध विमान कंपन्यांशी (एअर लाइन) संपर्क साधून प्राप्त करून प्रशासनास तत्काळ कळवावी, अशा सूचनाही विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.