विद्यापीठाच्या इनक्यूबेशन सेंटरच्या लौकिकात वृद्धी करावी : पालकमंत्री सुभाष देसाई
प्रकाशन दिनांक : 25/10/2021
औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इनक्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून रोजगाराभिमूख शिक्षण, स्टार्ट अप करण्यास साहाय्य करण्याच्या कार्यात अधिक वृद्धी करुन विद्यापीठाच्या लौकिकात वाढ करण्याची अपेक्षा उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथील व्यवस्थापन परिषद सभागृह येथे इनक्यूबेशन सेंटरबाबत आढावा बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, कुलगुरू प्रोफेसर डॉ. प्रमोद येवले, प्र. कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, मुंबई स्टॉक एक्सचेंजचे हेमंत गुप्ता, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी, इनक्यूबेशन सेंटरचे संचालक डॉ. सचिन देशमुख, संतपीठाचे प्रभारी डॉ.प्रवीण वक्ते, डॉ.गुलाब खेडकर, डॉ. वंदना हिवराळे आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री देसाई यांनी विद्यापीठाच्या कार्याचे कौतुक केले. इनक्यूबेशन सेंटरची कामगिरी अतिशय चांगली असून या सेंटरच्या माध्यमातून अजून संशोधन, रोजगार निर्माणात भरीव वाढ व्हावी. या सेंटरला आणि युवकांना श्री. गुप्ता यांचेही सहकार्य लाभेल, असे मत देसाई यांनी व्यक्त केले.
इनक्यूबेशन सेंटरचे संचालक डॉ.देशमुख यांनी विद्यापीठातील विविध उपक्रम, सोयी सुविधा, प्रवेश प्रक्रिया, इनक्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून रोजगार, स्टार्टअप, सेंटरमधील सुविधा आदींबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. सुरूवातीला कुलगुरू डॉ.येवले यांनी देसाई यांचे व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.