बंद

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सर्वोतोपरी सज्ज-जिल्हाधिकारी उदय चौधरी

प्रकाशन दिनांक : 22/04/2019

  • प्रशासनाकडून सर्वोतोपरी तयारी, 23 एप्रिलला मतदान
  • मतदारांच्या सुविधांसाठी सर्व उपाययोजना
  • पोलिसांचाही चोख बंदोबस्त

औरंगाबाद, दि.21 (जिमाका) :  औरंगाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक निर्भय, नि:पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. मतदारांच्या सुविधांसाठी सर्वोतोपरी उपाययोजना प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या आहेत. मतदारांनी 23 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी आज मतदारांना केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चौधरी बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीलेश श्रींगी आदींची उपस्थिती होती.

श्री. चौधरी म्हणाले, औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी  एकूण सहा विधानसभा क्षेत्र आहेत. जालना लोकसभा क्षेत्रात सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. औरंगाबाद लोकसभा मतदार संघात 18 लाख 86 हजार 283 मतदार आहेत. त्यामध्ये नऊ लक्ष 93 हजार 969 पुरूष, आठ लक्ष 92 हजार 289 महिला आणि 25 तृतीय पंथी  मतदार आहेत. तसेच यामध्ये 1418 नोकरदार मतदार आहेत. 

मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेबाबत जागृती व्हावी. मतदानाचा हक्क कसा बजावावा यासाठी बॅलट, व्हीव्हीपॅट यंत्राबाबत मतदान पूर्व जागृती करण्यात आलेली आहे. निवडणूक प्रकिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रमाणात बॅलट, गुणक आणि व्हीव्हीपॅट यंत्र, मनुष्यबळ उपलब्ध आहे. यामध्ये गुणक 2445, बॅलट 4903 आणि व्हीव्हीपॅट 2622 आहेत. तर 357 गुणक, 814 बॅलट, 519 व्हीव्हीपॅट यंत्रे राखीव आहेत.

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार दिव्यांग मतदारांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. लोकसभा मतदारसंघातील 11 हजार 131 दिव्यांग मतदारांना मतदानासाठी घरापासून मतदार केंद्रापर्यंत, केंद्रापासून घरापर्यंत पोहचण्यासाठी  शहरामध्ये 300 ऑटोरिक्षा नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. वृध्द, गरोदर माता, स्तनदा माता यांनाही मतदान करण्यासाठी अडचण येऊ नये, यासाठी त्यांना रांगेत उभे न रहाता मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. स्तनदा माता यांसाठी हिरकणी कक्ष मतदान केंद्र ठिकाणी असणार आहे याशिवाय सहाही विधानसभा मतदान संघात प्रत्येकी दोन याप्रमाणे महिला मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. मतदान केंद्रावर उष्णतेची लाट लक्षात घेता सावलीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मुबलक पाणी आणि पिण्याचे पाणी मतदान केंद्रांवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

निवडणूकीचे सर्व साहित्य मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी 124 बस, 480 जीप आणि 100 मिनी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनांवर जीपीएस प्रणाली कार्यन्वित करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातून या वाहनांवर देखरेख ठेवता येणार आहे. लोकसभा मतदारसंघात एकूण 2021 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 1196 अंगणवाडी सेविका, 199 मदतनीस, 723 आशा वर्कर, 608 राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, 685 पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी व इतर कर्मचारी यांसह स्वयंसेवी संस्थेचे 89 कर्मचारी असे एकूण 3 हजार 500 कर्मचारी स्वयंसेवक कार्यकर्ता म्हणून नेमले आहेत.

मतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठी पाठवून देण्यात आलेली आहे. परंतु ही चिठ्ठी पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जाणार नाही. या चिठ्ठीशिवाय ओळखीच्या 11 दस्त्ऐवजांपैकी ओळख सुनिश्चित करुन मतदानाचा हक्क मतदारांना बजावता येणार आहे. मतदान केंद्राबाहेर मतदार सहायता केंद्र राहणार आहे. याठिकाणी आवश्यक ती माहिती उपलब्ध करुन देण्यात येईल. मात्र, मतदान केंद्रांत छायाचित्र, व्हिडीओ शुटींग करण्यास आयोगाच्या सूचनेनुसार प्रतिबंध आहे. त्यामुळे मतदान करतेवेळी, मतदान केंद्रातील छायाचित्रे व्हिडीओ शुटींग कोणीही करु नये, असे आवाहनही यावेळी श्री.चौधरी यांनी केले.   

पोलिसांचा चोख बंदोबस्त

पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. ग्रामीण क्षेत्रात 3 पोलीस उप अधीक्षक, 5 पोलीस निरीक्षक, 52 सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 505 इतर कर्मचारी, 448 होमगार्ड, यांसह सीआयएसएफ, सीआरपीएफ, एसआरपीएफ कंपन्या तसेच  शहरी भागात तीन पोलीस उपायुक्त, 6 सहायक पोलीस उपायुक्त, 35 पोलीस निरीक्षक, 650 होमगार्ड, सीआयएसएफ, एसआरपीएफ आदी कंपन्यांचे पोलीस मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत, असे पोलीस आयुक्त श्री.प्रसाद, पोलीस अधीक्षक श्रीमती पाटील यांनी सांगितले.

******

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सर्वोतोपरी सज्ज - जिल्हाधिकारी उदय चौधरी