बंद

“माझी वसुंधरा” अभियानात लोकसहभाग वाढवावा – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

प्रकाशन दिनांक : 27/01/2022

औरंगाबाद, दि. 26, (जिमाका) – बदलत्या वातावरणामध्ये सुरक्षित राहण्यासाठी पृथ्वीचे तापमान आणि पर्यावरणाचे जतन करणे गरजेचे आहे. त्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या “माझी वसुंधरा अभियानात” लोकसहभाग वाढवण्याच्या सूचना पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित “माझी वसुंधरा” अभियानाच्या आढावा बैठकीत श्री.ठाकरे बोलत होते. यावेळी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह संबंधित अधिकारी तसेच दुरदृश्यप्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

श्री.ठाकरे यांनी औरंगाबाद विभागात या अभियांनातंर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती घेऊन विभागातील सर्व जिल्हे उत्तम काम करत असल्याबाबत समाधान व्यक्त्‍ करुन सर्व यंत्रणांचे अभिनंदन केले. कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामाना करत असतानाच्या काळातही आठ महिन्यांत उल्लेखनीय काम या अभियानातंर्गत झाले आहे. सर्व जिल्ह्यांकडून त्याचपध्दतीने पुढील वर्षातही भरीव काम अपेक्षित आहे. जलसंधारण, वृक्षारोपण, सोलारचा वाढता वापर, यासह विविध पर्यावरणपुरक उपक्रम जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त, लोकप्रतिनिधी या सर्वांनी परस्पर सहकार्याने जबाबदारीच्या भूमिकेतून राबविणे आवश्यक आहे. बदलत्या पर्यावरणीय वातावरणात टिकाव धरुन राहण्यासाठी जीवीत संरक्षणाला पुरक वातावरण कायम ठेवणे ही काळाची गरज बनली आहे. त्या दृष्टीने या अभियानाची व्याप्ती वाढवत असतांना त्यामध्ये लोकांचा सक्रीय सहभाग महत्वाचा असल्याचे सूचित करुन श्री.ठाकरे यांनी जनमाणसात माझ्या स्वत:साठी मी काय करु शकतो याबाबत जागरुकता निर्माण होणे गरजेचे असून त्या दृष्टीने वसुंधरेची सुरक्षा म्हणजे आपली सुरक्षा ही जाणीव राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवायची आहे. असे सांगून श्री.ठाकरे यांनी स्वच्छ हवा व पाणी कायम मिळवण्यासाठी शाश्वत विकासावर शासनाचा भर आहे. माझी वसुंधरा अभियानातंर्गत केलेल्या कामामुळे जागतिक पातळीवर महाराष्ट्राला पुरस्कार मिळाला आहे. जगभरात या संदर्भातील कामात महाराष्ट्राचा उल्लेख होणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. त्या प्रेरणेतून आपल्याला अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, वादळ या वातावरणीय बदलातून उद्भवणाऱ्या आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान करणाऱ्या नैसर्गिक संकटांवर मात करायची आहे. त्यासाठी पर्यावरणाचे जतन, समतोल अत्यंत महत्वाचा आहे. हे लक्षात घेऊन जनसहभागासह सर्व यंत्रणांना सोबत घेऊन येत्या वर्षात वनक्षेत्रफळात वाढ करण्यावर भर द्यायचा आहे. असे सूचित करुन श्री.ठाकरे यांनी पर्यावरण संरक्षणासाठी राबवावयाच्या उपक्रमांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पनांचे स्वागत असून पर्यावरण खात्यामार्फत या कामासाठी आवश्यक सहकार्य मिळेल असे यावेळी सांगितले.

औरंगाबाद विभागात विभागीय आयुक्त्‍ सुनील केंद्रेकर यांच्या मार्गदर्शनात महसून, वन, नगर विकास, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह इतर सर्व संबंधित विभागांच्या एकत्रित प्रयत्नातून बांबु लागवड, सोलार वेस्ट मॅनेजमेंट, वृक्ष लागवड, जलसंधारण, पाण्याचा पुर्नवापर, अटल वन, यासह माझी वसुंधरा अभियानातंर्गत्‍ विविध उपक्रमांद्वारे सर्व जिल्ह्यांमध्ये उल्लेखनीय काम होत आहे. विभागात 2026 ठिकाणी घनवन उपक्रमांतर्गत्‍ 2020-21 मध्ये 73 लाखांपेक्षा जास्त झाडे लावण्यात आली. तसेच प्रतिव्यक्ती तीन झाडे या अंतर्गत 1 कोटी 75 लाख वृक्षारोपण विभागात करण्यात आले. त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त कार्यालयात 700 रोपांची नर्सरी विकसीत करण्यात आली असल्याचे उपायुक्त (रोहयो) समीक्षा चंद्राकार यांनी सांगितले. पैठण, अंबाजोगाई, पैठण, उदगीर, बीड, लातूर, परभणी यांसह विभागात सर्व जिल्ह्यात प्रभावीपणे या अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. तसेच विविध ठिकाणी अंगणवाडी परिसरात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विविध ठिकाणी पाणवठे तयार करण्याचे काम करण्यात येत असून शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना अवकाश, वन्यजीवां बद्दलची माहिती देण्याच्या दृष्टीने ॲस्ट्रॉनॉमी क्लब, वाईल्ड लाईफ क्लब, सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती वीणा सुपेकर, यांनी यावेळी दिली. विविध जिल्ह्यांमध्ये माझी वसुंधरा अभियानातंर्गत राबविण्यात येत असलेल्या कामांची सविस्तर माहिती दुरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झालेल्या जिल्हाधिकारी आणि यंत्रणा प्रमुख यांनी दिली.