भेसळमुक्त, सकस आहाराला नागरिकांनी प्राधान्य द्यावे – डॉ.राजेंद्र शिंगणे
प्रकाशन दिनांक : 18/11/2021
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वॉकेथॉन
औरंगाबाद, दिनांक 18 (जिमाका) : सुदृढ आरोग्यासाठी नागरिकांनी सकस, चांगले, सर्व जीवनसत्वे असलेले आणि भेसळमुक्त अन्नाचे सेवन करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीचे अन्न नागरिकांना मिळावे यासाठी शासनस्तरावरून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. अन्न औषध प्रशासन विभागाकडून आस्थापनांची तपासणी, दोषींवर कारवाई करण्यात येऊन नागरिकांच्या सुरक्षिततेला शासनाकडून प्राधान्य देण्यात येत असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आज सांगितले.
एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आणि अन्न औषध प्रशासन विभागाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ईट राईट इंडिया मोहिमेंतर्गत वॉकेथॉन 2021 च्या शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी मंत्री डॉ.शिंगणे बोलत होते. यावेळी त्यांच्याहस्ते झेंडी दाखवून वॉकेथॉनची सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक निमित गोयल, अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या संचालक प्रिती चौधरी, सहसंचालक संजीव पाटील, अन्न औषध प्रशासन सह आयुक्त उदय वंजारी आदींची उपस्थिती होती.
मंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, सर्व रोगांचे मूळ पोटात दडलेले आहे. म्हणून आजच्या धावपळीच्या जीवनात उत्कृष्ट, निकोप, सर्व जीवनसत्त्वे असलेले भेसळमुक्त अन्न सेवन करणे अत्यावश्यक झाले आहे. औरंगाबादेत फिरत्या वाहनाद्वारे अन्न तपासणी करण्यात येते आहे. यापुढेही एफएसएसएआयसह अन्न औषध प्रशासन विभाग अन्न तपासणीवर अधिक भर देणार असल्याचेही श्री.शिंगणे म्हणाले. तसेच भेसळ करणाऱ्यांवर पाच लाखापर्यंत दंड, सश्रम कारावास अशी कारवाईची तरतूद असल्याचेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, सर्वांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तरुणांनी जंक फूड टाळून दर्जेदार आहारासाठी आग्रही असावे. तर आरोग्यासाठी वेळेवर सकस आहार घेणे आवश्यक असून सात्विक अन्न सेवन करण्यास प्रत्येकाने प्राधान्य द्यावे, असे आवाहन श्री. गोयल यांनी केले. वॉकेथॉनमध्ये सहभागींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षा पाटील यांनी केले.