बंद

फर्दापूर येथील ‘शिवस्मारक’ आणि ‘भीमपार्क’चे काम गतीने पुर्ण करावे – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

प्रकाशन दिनांक : 16/02/2022

  • अंजिठा लेण्याच्या परिसरात सौर विद्युत प्रकल्प उभारावा
  • सिल्लोड तालुका क्रीडा संकुल, मुलींच्या वसतिगृह
  • संविधान सभागृहाचे प्रस्ताव तात्काळ सादर करा

औरंगाबाद, दि. 15 (जिमाका) : सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्धेसह सर्व प्रक्रीया तात्काळ पुर्ण करुन बांधकामास प्रत्यक्षात सुरूवात करण्यात यावी, असे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

शिवस्मारक व भीम पार्क उभारण्यासंदर्भात दुरदृश्यप्रणालीद्वारे मंत्रालयातून आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी निलेश गटने, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, पर्यटन उपसंचालक श्रीमंत हारकर, जिल्हा क्रीड़ा अधिकारी कविता नावंदे, सिल्लोड तहसीलदार विक्रम राजपूत, सोयगाव तहसीलदार रमेश जसवंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता येरेकर, समाज कल्याण वसतिगृह चे अधीक्षक श्रीमती.बडवे तसेच सिल्लोड नगरपालिकेचे मुख्याधिकारी सय्यद रफिक कंकर आदी उपस्थित होते.

श्री.सत्तार म्हणाले की, अजिंठा या जगप्रसिद्ध लेण्यांना देश-विदेशातून पर्यटक भेट देत असतात. या लेण्यांच्या सभोवताली सिल्लोड सोयगाव शहराच्या परिसरात एकात्मिकरित्या पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी अजिंठा-वेरूळ संवर्धन व विकास प्रकल्प यांची आखणी करण्यात आली.फर्दापूर येथील ५५० एकर जमीन पर्यटन विकास महामंडळातर्फे अधिग्रहित करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात जगप्रसिद्ध अजिंठा लेणीची पर्यटनाच्या दृष्टिकोनातून असलेले महत्त्व आणि या लेण्या बरोबरच महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट देश विदेशातील पर्यटकांना माहिती होणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य त्या काळातील जाणता राजाच्या रुपाने त्यांनी प्रजेला दिलेला न्याय, सुसज्य अष्टप्रधानमंडळ,युद्धतील वेगवेगळ्या घटना, स्मारकाच्या रुपात करण्यात येणार आहे. अंजिठा लेण्याच्या परिसरात सौर विद्युत प्रकल्प निर्माण उभारणीतून विजेची मागणी पूर्ण करण्यासंदर्भातले नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. त्याचबरोबर सिल्लोड नगरपालिकेच्या वर्ग-3 व वर्ग-4 चे भरतीबाबतचे प्रस्ताव पाठपुरावा करुन मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबतही आढावा घेतला. सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील शासकीय जमीनीवर नाटयगृह उभारणी बाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुचना केल्या. त्यासाठी जमीन नोंदणीचे अभिलेखे तपासून शासकीय कार्यालयासाठी जमीन उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले.

सिल्लोड येथील तालुका क्रीडासंकुलाचा प्रस्ताव अर्थसंकल्पात समावेश करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच तालुक्यातील विविध व्यायाम शाळेत क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी. निधी कमी पडू दिला जाणार नाही यासाठी संबंधित विभागात स्वतः पाठपुरावा करणार आहे. सामाजिक न्याय विभागाचे मुलींचे वसतिगृह सिल्लोड येथे बांधण्यासाठी लागणारी जागा नगरपालिका प्रशासनाच्या पातळीवर योग्य ती कार्यवाही करण्यासंबंधीचा परिपूर्ण प्रस्ताव शासन स्तरावर पाठवण्यात यावा. सिल्लोड-सोयगाव मध्ये संविधान सभागृहे बांधण्याचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत असेही श्री. सत्तार यांनी यावेळी सांगितले.

फर्दापूर येथील ‘शिवस्मारक’ आणि ‘भीमपार्क'चे काम गतीने पुर्ण करावे