पर्यटन स्थळे अद्यावत सोईसुविधायुक्त करण्यावर भर – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
प्रकाशन दिनांक : 27/01/2022
औरंगाबाद, दि. 26, (जिमाका) – पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्राचे महत्वपूर्ण स्थान असून अजिंठा, वेरुळ या जागतिक पर्यटन स्थळांमुळे औरंगाबाद विभाग महत्वपूर्ण ठरतो, त्यादृष्टीने औरंगाबाद येथे अद्यावत सोईसुविधायुक्त पर्यटन स्थळांचा सर्वांगिण विकास करण्याच्या सूचना पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मराठवाड्यातील पर्यटन स्थळांच्या विकासा संदर्भात आढावा बैठकीत श्री.ठाकरे बोलत होते. यावेळी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक निमित गोयल, पर्यटन विभागचे संचालक मिलिंद बोरीकर, पर्यटन उपसंचालक औरंगाबाद श्रीमंत हारकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, सहसंचालक विजय जाधव, यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पर्यटन विभागचे अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत श्री.ठाकरे यांनी सर्व जिल्ह्यांतील पर्यटन विकास योनजेअंतर्गत मंजूर कामे, प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पर्यटन विकासासाठी असलेल्या निधीच्या मागणी संदर्भात तसेच पर्यटन विकासाच्या प्रस्तावित कामांची माहिती घेतली. औरंगाबाद विभागातील ऐतिहासिक स्थळे, जागतिकदृष्ट्या महत्वाची वारसा स्थळे यांच्या विकासात तसेच पर्यटन वृध्दीसाठी आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करावा. पर्यटनस्थळांपर्यंत पोहचण्यासाठी चांगले रस्ते, परिवहन व्यवस्था, निवासव्यवस्था, उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा असण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना श्री.ठाकरे यांनी केल्या.
यावेळी विभागातील विविध पर्यटनस्थळांसंदर्भात तसेच राज्यमंत्री श्री.सत्तार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणाऱ्या शिवपार्क व भीमपार्कच्या आराखड्याचे व्हिडीओद्वारे सादरीकरण करण्यात आले. श्री.सत्तार यांनी अंजिठा या जागतिक पर्यटन स्थळी अद्यावत सोयीसुविधा आणि पुरक विकास कामे गतीमानतेने होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी पर्यटकांना निवासाची तसेच जेवणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी हॉटेल 11 वाजेपर्यत सुरू ठेवण्याची सूचना केली. तर आमदार अंबादास दानवे यांनी वेरुळ येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-211 महामार्गाला जोडण्याची सूचना केली. दौलताबाद किल्ला परिसरातील गर्दी, वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी रस्त्याचा आराखडा एमटीडीसीद्वारे तयार करण्यात आला असून प्रत्यक्ष पाहणी तसेच अंजिठा, वेरुळ येथील शिवपार्क, भीमपार्क प्रकल्पाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.