बंद

वृक्षलागवडीच्या चळवळीत जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

प्रकाशन दिनांक : 13/06/2019

  • औरंगाबाद विभागात 9 कोटी 28 लाख 42 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
  • मोहिमेचा कालावधी दि. 1 जुलै ते 30 सप्टेंबर
  • सर्व विभागांनी समन्वयाने ‘मिशनमोड’वर कामे करावी
  • मियावाकी संकल्पनेवर आधारित अटल आनंदवन

औरंगाबाद, दि.10, (जिमाका) :- हरित मराठवाडा करण्यासाठी जनतेने मोठ्या संख्येने वृक्षलागवडीच्या चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वृक्ष लागवडीसोबतच त्याच्या संगोपनावरही भर दिल्या जावा, असेही ते म्हणाले.

            औरंगाबाद येथील वाल्मी संस्थेत 33 कोटी वृक्षलागवडीसंदर्भात आज श्री.मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय बैठक संपन्न झाली. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बैठकीस विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार सर्वश्री अतुल सावे, विनायक जाधव, मोहन फड, लक्ष्मण पवार, प्रशांत बंब, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, मुख्य वन संरक्षक प्रकाश महाजन यांच्यासह विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त उपस्थित होते.

            तापमान वाढ, पाणीटंचाई, अशा संकटांवर मात करण्यासाठी वृक्षलागवड करणे आवश्यक आहे. त्यासाठी वृक्ष लागवडीचा उपक्रम शासकीय न रहाता जनतेचा झाला पाहिजे, असे सांगुन श्री.मुनगंटीवार म्हणाले की, पर्यावरण रक्षणासाठी वन संवर्धन गरजेचे असून त्यासाठी 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाला वनआंदोलनाचे स्वरुप लोकसहभागातून येणे आवश्यक आहे. या वर्षी वृक्षलागवडीची मोहिम 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. मराठवाडा विभागासाठी 9 कोटी 28 लक्ष 42 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 12 कोटी 16 लक्ष 37 हजार रोपे तयार करण्यात आली आहे. या मोहिमेत शासनाच्या सर्व विभागांचा सहभाग राहणार आहे. वनविभगातर्फे हरित सेना हा उपक्रम राबविण्यात येत असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही मोहिम अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यासाठी तसेच वृक्षलागवडीबद्दल जनतेमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी नागपूर येथे कमांड रुम तयार करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

            वृक्षारोपण मोहिमेसोबतच लोकसहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगतांना वन मंत्री म्हणाले की, सामाजिक उद्देश समोर ठेवून मुलीच्या जन्माचे स्वागत करताना कन्या वन समृध्दी योजनेच्या माध्यमातून दहा झाडे देण्याचे धोरण तयार करण्यात आले आहे. यापैकी पाच झाडे ही सागाची तर पाच झाडे ही फळवृक्षांची आहे. बांबुचे क्षेत्र वाढविण्यासाठी बांबु मिशन राबविण्यात येत आहे.  शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानास वनयुक्त शिवाराची जोड दिल्याने वनक्षेत्रातील जलसाठे 432 चौ.कि.मी.ने विस्तारले आहे. ज्या भागात वनक्षेत्रे कमी आहेत तेथे विशेष योजना देण्यात येणार असून या माध्यमातून वनशेती व त्यादृष्टीने रोजगार वाढविण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. स्व.भाऊसाहेब फुंडकर फलोत्पादन योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी या योजनेअंतर्गत उद्दिष्टे न देता मागेल त्याला या योजनेचा लाभ देण्याचे ठरविण्यात आले आहे.

            जैवविविधता राखणाऱ्या आणि कमी क्षेत्रात अनेक प्रकारची घनदाट झाडी असणाऱ्या ‘मियावाकी’ या जपानी संकल्पनेवार आधारित अटल आनंदवन ही योजना राज्यभर राबविण्यात येणार आहे. विशेषत: शहरामध्ये वनांच्या निर्मितीसाठी हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग किंवा अन्य प्रकल्पासाठी वृक्ष तोडली जातात . या वृक्षांच्या प्रमाणात दुसरी नवीन वृक्ष लावण्याची जबाबदारी देखील निश्चित केली आहे. मात्र जी यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करेल त्यावर दंड व शिक्षा करण्याचा निर्णय शासन घेणार आहे. महाराष्ट्र वन विभागाने वन संरक्षणासाठी नागरिकांचे संदेश, सूचना, प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हॅलो फॉरेस्ट हा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत 1926 हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध आहे. इको बटालियनच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे. या वृक्षलावगडीच्या मोहिमेत सर्वांनी हिरीरीने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

            नांदेड वन विभागाच्या माहिती पुस्तिकेचे बैठकीत मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यानंतर विभागातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वृक्षलावगडीबाबत सादरीकरण केले.  

******

वृक्षलागवडीच्या चळवळीत जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार