बंद

विद्युत वाहिनी व डी.पी स्थलांतरितासाठी 2.80 कोटी खर्चास मंजुरी

प्रकाशन दिनांक : 07/01/2021

औरंगाबाद, दिनांक 06 (जिमाका) : जालना रोडवरील एपीआय कॉर्नर ते कलाग्राम –गरवारे स्टेडिअममार्गे प्रोझोन मॉल रस्त्यांतर्गत बाधित होणाऱ्या उच्चदाबाच्या विद्युत वाहिनी व ङिपी स्थलांतरीत करण्यासाठी  2.80 कोटी खर्चास उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मंजुरी दिली आहे. या रस्त्यांची  प्रत्यक्ष पाहणी नुकतीच तत्कालीन मनपा प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांसह केली होती. या स्थळ पाहणी अहवालाची दखल घेत पालकमंत्री श्री. देसाई यांनी या खर्चास मान्यता दिली आहे.

एपीआय कॉर्नर जालना रोड ते कलाग्राम ते गरवारे स्टेडियम मार्गे प्रोझॉन मॉल  या रस्त्याचे काँक्रीटींग करण्याचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यंत्रणेमार्फत प्रगतीपथावर आहे. सदरील रस्त्याची एकूण लांबी 2700 मी व रुंदी सर्वसाधारण 30 मी. आहे. प्रोझॉन मॉल ते गरवारे स्टेडियम या भागात रस्त्याच्या कॅरिजवेमध्ये  महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. विभागाच्या उच्च दाबाच्या विद्युतवाहिनी  व ङिपी येत असल्यामुळे काम करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. सदरील रस्ता या भागातील मुख्य रस्ता असून अत्यंत रहदारीचा व वर्दळीचा  आहे. त्यामुळे सदरील रस्ता पूर्ण रुंदीमध्ये विकसित करणे आवश्यक आहे. सदरील रस्त्याच्या कामाच्या मूळ अंदाजपत्रकात रस्ते कामांतर्गत बाधित होणाऱ्या विद्युत खांब व विद्युत डीपी  स्थलांतरित करणेसाठी पुरेशी तरतुद करण्यात आलेली नाही.

सदरील रस्त्यांतर्गत बाधीत होणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनी  व डी.पी स्थलांतरित करणेसाठी अंदाजे रक्कम रु. 2.80 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. त्या बाबतचे अंदाजपत्रक  तयार करण्यात आलेले आहे. सद्यस्थित औरंगाबाद महानगरपालिका व MSEDCL विभागाच्या आर्थिक परिस्थिती अभावी काम करणे शक्य होणार नाही. त्यामुळे सदरील Utility Services स्थलांतरित करण्यासाठी सदरिल कामाची कार्यान्यवन यंत्रणा MIDC विभाग असल्याने संबंधित विभागाने आर्थिक तरतूद उपलब्धतेबाबत नियोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी पाहणी अहवालात नमूद केले होते.