बंद

पदवीधर मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा

प्रकाशन दिनांक : 01/12/2020

 खासगी आस्थापनांनी वेळेची सुट देण्याचे आवाहन

 

औरंगाबाद, दिनांक 30 (जिमाका): महाराष्ट्र शासन निर्णयानुसार दिनांक 01 डिसेंबर , 2020 मंगळवार रोजी होणाऱ्या 05 – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2020 निवडणुकीसाठी पदवीधर मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे. सदरची रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमितिक रजेव्यतिरिक्त असणार आहे, असेही ते म्हणाले.

भारत निवडणूक आयोग यांचे दिनांक 02 नोव्हेंबर , 2020 रोजीचे प्रसिध्दी पत्रकानुसार 05 – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक -2020 निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. सदर निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान दिनांक 01 डिसेंबर , 2020 (मंगळवार) रोजी सकाळी 08.00 ते सायंकाळी 05.00 पर्यंत होणार आहे. महाराष्ट्र शासन , सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार सदर निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करणेबाबत निर्देश दिलेले आहेत, असेही त्यांनी कळवले आहे

जिल्ह्यातील खासगी आस्थापना, कारखाने, दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी लागणाऱ्या वेळेपुरती सवलत द्यावी. वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी योग्य त्या सुविधांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.