बंद

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा समिती गठित

प्रकाशन दिनांक : 17/12/2021

  • डॉ. अंभुरे, डॉ.वावगे, मगर, कुमठेकर समितीचे अशासकीय सदस्य

औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका) : मराठी भाषा व साहित्याचे अभ्यासक डॉ. कैलास अंभुरे यांच्यासह डॉ.सविता वावगे, ग्रंथालय चळवळीचे गुलाबराव मगर, प्रकाशक अशोक कुमठेकर या अशासकीय सदस्यांची औरंगाबाद जिल्ह्यात मराठी भाषा समितीच्या सदस्य पदी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नियुक्ती केली आहे.

मराठी भाषा सरकारी कामकाजात वापरली जावी आणि तिला डावलले जाऊ नये यासाठी महाराष्ट्र राजभाषा सुधारणा विधेयक -२०२१ संमत करण्यात आले. मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि विस्तार करण्यासाठी राज्य व जिल्हास्तररीय समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यानुसार महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४, सुधारित अधिनियम क्र.१४, दि. १६ जुलै २०२१ नियम ५ ड (४)नुसार औरंगाबाद जिल्ह्याकरिता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मराठी भाषा पद निर्देशित अधिकारी प्रभोदय मुळे हे सदस्य सचिव आहेत. या समितीमध्ये शासकीय क्षेत्रातील चार अधिकारी व अशासकीय क्षेत्रातील चार व्यक्तींची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय क्षेत्रातील महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, पोलीस अधीक्षक निमित गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.

अशासकीय सदस्य भाषा क्षेत्रातील व्यक्ती म्हणून डॉ. कैलास अंभुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच साहित्य क्षेत्रातील डॉ.सविता वावगे, ग्रंथालय चळवळीचे गुलाबराव मगर, प्रकाशक अशोक कुमठेकर यांचीदेखील सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. डॉ. कैलास अंभुरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात सहायक प्राध्यापक आहेत. त्यांचे ‘आशययुक्त अध्यापन पद्धती : मराठी’ (सहलेखन) व ‘समीक्षा पद्धती : संदर्भलक्ष्यी ’ ग्रंथ प्रकाशित आहेत. आधुनिक साहित्या‍चे अभ्यासक म्हणून ते सर्वपरिचित असून विविध महाविद्यालये व विद्यापीठांच्या अभ्यास मंडळावर सदस्य आहेत.