बंद

कुष्ठरोग, क्षयरुग्ण शोध मोहीम प्रभावीपणे राबवा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 30/11/2020

01 डिसेंबर ते 16 डिसेंबरमध्ये होणार घरोघरी सर्वेक्षण

   समाजात जनजागृती करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन   

औरंगाबाद, दि.27 (जिमाका) :   राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 01 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबवून जिल्ह्यातील कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण निर्मुलन करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज आरोग्य यंत्रणेतील आधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान, सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम संदर्भात जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक पार पडली. यावेळी श्री.चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.एस. शेळके, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) विभागाचे सहायक संचालक डॉ. ए.बी.धानोरकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. अविनाश बोरकर आदींची यावेळी उपस्थिती होती.

श्री. चव्हाण म्हणाले,  समाजात  क्षयरोग कुष्ठरोगाविषयी मोठ्याप्रमाणात जनजागृती करावी, निदान न झालेल्या कुष्ठरुग्णांना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर त्वरीत बहुविध औषधोपचार सुरु करावा. नवीन संसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचारांव्दारे संसर्गाची साखळी खंडित करुन होणारा प्रसार कमी करावा. कुष्ठरुग्णांमध्ये विकृतीचे प्रमाण कमी करावे. तसेच क्षयरोग शोध मोहिमेंतर्गत प्रशिक्षित पथकाव्दारे गृहभेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात यावा. संशयित क्षयरुग्णाचे थुंकी नमुने व एक्स-रे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासणी करुन क्षयरोगाचे निदान करावे आणि औषधोपचार सुरु करावेत. आरोग्य यंत्रणेला या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ती मदत प्रशासनामार्फत करण्यात येईल. मात्र, आरोग्य यंत्रणेने सदरील मोहीम अचूक, पारदर्शक व प्रभावीपणे पार पाडावी. त्याचबरोबर क्षयरुग्ण, कुष्ठरुग्ण निर्मुलनासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचे नियोजन करुन कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देशही श्री. चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीच्या सुरुवातीला डॉ. धानोरकर यांनी उपस्थितांचे स्वागत करुन जिल्ह्यातील कुष्ठरुग्ण व करावयाच्या उपाययोजना, सद्यस्थिती याबाबत सविस्तर माहिती सादर केली. यामध्ये जिल्ह्यातील सद्यस्थितीत करावयाच्या उपाययोजना कृती कार्यक्रमाचे नियोजन जिल्हास्तरीय कृती कार्यक्रम, तालुका समन्वय समिती, अभियानांतर्गत कार्यशाळा आशा, पुरुष स्वयंसेवकांचे प्रशिक्षण, मनुष्यबळ स्थिती अहवाल आणि दुर्गम भाग, वीटभट्टी, बांधकामे, कारागृह, आश्रमशाळा, खानीतील कामगार, विनकाम, कापडगिरणी, कामगार इत्यादी भागातील सर्वेक्षणाचे नियोजन, सर्वेक्षण पद्धती आदींबाबत सादरीकरण केले. तर क्षयरोग अधिकारी डॉ. गंडाळ यांनी जिल्ह्यातील क्षयरोगांची स्थिती आणि आवश्यक साधनसामुग्री बाबत माहिती सादर केली.