बंद

Break The Chain अंतर्गत नियमांचे काटेकोर पालन करा अन्यथा कडक कारवाई – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 07/05/2021

औरंगाबाद, दि.07, (जिमाका):- जिल्ह्यातील कोरेाना रुग्णांची संख्या हळुहळु नियंत्रणात येत आहे.  परंतु काही दिवसांपासून जिल्ह्यात Break The Chain नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. यापुढेही Break The Chain नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली Break The Chain  च्या अनुषंगाने बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, मनपा अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने , जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार,  जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे, तसेच अन्न व औषध प्रशासनाचे श्री काळे,  कृषि अधिकारी श्री गंजेवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्ह्यामध्ये सर्व यंत्रणा  सक्षमपणे काम करत आहे. शहरातही मनपाचे वार्डनिहाय पथके कार्यरत आहेत तसेच पोलिस आणि महसुल प्रशासन देखील उत्तम काम करत असून नियम मोडणाऱ्यांवर अनेक कारवाया देखील करण्यात आल्या आहेत. परंतु अनेक ठिकाणी नियमांचे तंतोतंत पालन होताना दिसत नसल्याचे सांगुण जिल्हाधिकारी म्हणाले की, अनेक ठिकाणी औषधांच्या दुकानांवर आईसक्रीम, चॉकलेट्स तसचे इतर साहित्य विक्रीसाठी ठेवल्याचे निदर्शनास आले आहे, शहरात नागरिक अनेक ठिकाणी विनामास्क आणि विनाकारण फिरताना निदर्शनास येत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करा, प्रादेशिक परिवहन विभागाने पेट्रोल पंपावर पथक तैनात करुन विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, राज्य उत्पादन विभागाने देखील मद्य विक्रेते नियमांचे पालन करत आहेत का हे गांभीर्यांने पाहावे नसता नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी मेडिकल होणारी गर्दी लक्षात घेता तिथे शारीरिक अंतर पाळण्याचे नियम कडक करण्याचे निर्देश दिले, जे दुकाने सकाळी 11 नंतर उघडी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी आपआपल्या विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कारवाईं बाबत जिल्हाधिकारी यांना माहिती दिली.

अन्न व औषध विभागचे आयुक्त श्री काळे म्हणाले की, मेडिकलच्या दुकानांवर इतर साहित्यांची विक्री करणाऱ्या मेडिकल चालकांवर कडक कारवाई करण्यात आली असून यापुढेही यावर लक्ष ठेवले जाणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक श्री कदम यांनी सांगितले की, Break The Chain  अंतर्गत नियमांचे पालन न करणाऱ्या 17 आस्थापणांवर कारवाई केली असून आजपर्यंत 89 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यापुढेही नियमांची कडक अमंलबजावणी करण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार आपल्या विभागामार्फंत केलेल्या कारवाई बाबत सांगताना म्हणाले की, कोविडच्या पार्श्वभुमीवर नवीन वाहनांची नोंदणी पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे आणि यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सागितले.

Break The Chain अंतर्गत नियमांचे काटेकोर पालन करा अन्यथा कडक कारवाई