अवैध गौनखनिज वाहतूक करताना जप्त करण्यात आलेल्या वाहनांची मूल्यांकन प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशन दिनांक : 17/02/2022
- तुकडेबंदीचे फेर तात्काळ थांबविण्याचे निर्देश
- नोटिसांना प्रतिसाद न देणाऱ्यांवर बोझाची कारवाई करा
- वाळू चोरी करणाऱ्या व्यक्तीस मदत करण्यावर गुन्हे दाखल करा
औरंगाबाद दि 16 (जिमाका ) :अवैध गौनखनिजाची वाहतूक करताना जप्त केलेल्या वाहनांचा नोटीस कालावधी संपल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून मूल्यांकन करण्याची प्रक्रिया तात्काळ करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.
शासनाने ठरवून दिलेल्या महसूल वसूलीबाबत उदिष्ट पूर्ण करण्यासंदर्भात आज औरंगाबाद तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठी यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी महसूल वसूलीत अनधिकृत बांधकाम, गौण खनिजावरील कर, वाळू व मुरुम यांची रॉयल्टी, वीटभट्ट्या, व्यावसायिक हुरर्डा पार्टी, तुकडेबंदीवरील गुन्हे, शर्तभंग, फार्म हाऊस,पेट्रोल पंप वरील कर व इतर महसूल वसूलीचा मंडळनिहाय आढावा जिल्हाधिकारी यांनी घेऊन कारवाई संदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या.तसेच कामाच्या वेळी गैरहजर असणाऱ्या तलाठ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे , तहसीलदार ज्योती पवार, विजय चव्हाण व औरंगाबाद तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.
अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी गौनखनिज व NA संदर्भातची वसुली आदेशानुसारच करण्याच्या सूचना केल्या.