गृह विलगीकरणातील रुग्णांशी नियमित संपर्क ठेवावा-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशन दिनांक : 17/01/2022
औरंगाबाद दि 17 (जिमाका): जिल्ह्यासह राज्यभरात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात रुग्ण संख्या जरी वाढत असली तरी रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या कमी आहे. अनेक रुग्ण गृह विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. असे उपचार घेणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून नियमितपणे संपर्क साधला जात आहे. अशाच प्रकारे ग्रामीण भागातील गृह विलगीकरणातील रुग्णांशी देखील नियमितपणे संपर्क साधून त्यांची विचारपूस करावी, त्यांना औषध सेवनांच्या बाबतीत मार्गदर्शन करून रुग्णांच्या नियमितपणे संपर्कात राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, संगीता सानप, संगीता चव्हाण, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, तसेच इतर संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत आहे. शहर आणि ग्रामीण भागातील 1 ते 16 जानेवारी पर्यंत वाढलेल्या रुग्णसंख्येचा विश्लेषणात्मक अभ्यास करावा आणि अहवाल सादर करावा. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व यंत्रणांनी काम करावे. लसीकरणामध्ये देखील सर्वांनी सहभाग घेऊन लसीकरणाचे उद्दिष्ट्य पुर्ण करावे. ज्या नागरिकांचा दुसरा डोस प्रलंबित आहे त्यांनी तात्काळ डोस घ्यावा असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.