बंद

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून तंबाखू विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे कौतुक

प्रकाशन दिनांक : 27/12/2021

औरंगाबाद, दि.24 (जिमाका) – तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून होणारे दुष्परिणाम, व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश आरोग्य विभागाकडून लोककला व पथनाट्यामार्फत जिल्हाभरात देण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात लोककला पथकाने तंबाखू विरोधी जनजागृतीपर कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. जिल्हाधिकारी यांनी कलापथकातील कलाकारांचे कौतुक करून प्रभावीपणे जनजागृती करण्याच्या सूचनाही यावेळी केल्या.

            राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थाचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम, असंसर्गजन्य आजारासंबंधी प्रतिबंधात्मक उपाययोजना निदान व उपचारांची समाजात प्रभावीपणे जागृती होण्यासाठी लोककला व पथनाट्य मंडळामार्फत जनजागृती करण्यात येते आहे. जिल्हाभरात एकूण 28 ठिकाणी 14 लोककला पथकाकडून जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील या जनजागृती कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ.महेश लड्डा, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार अमोल काकड यांची प्रमुख उपस्थिती होती. योगेश सोळुंके,लक्ष्मीकांत माळगे, कैलास ताटीकोंडलवार, डॉ. एस.के. शेख यांचीही यावेळी उपस्थिती होती. कलापथकातील लक्ष्मण मोकासरे, एकनाथ त्रिभवून, सुखदेव धामणकर, डॉ. एम.डी.संकपाळ, सचिन मोकासरे, गोपाल बोर्डे, प्रमोद जोगदंड, श्री. दहीहंडे यांनी कलेच्या माध्यमातून तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम आणि आरोग्याची काळजी यावर कार्यक्रम सादर केला. उपस्थितांकडून पथकातील कलाकारांच्या कलेचे विशेष कौतुक झाले.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून तंबाखू विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे कौतुक