अल्पसंख्याक समाजाच्या मागण्यांचा आयोगाकडून सकारात्मक विचार -ज.मो.अभ्यंकर
प्रकाशन दिनांक : 04/02/2019
औरंगाबाद,दि.३ (जिमाका) – औरंगाबाद जिल्ह्यात अल्पसंख्यांक समाज मोठ्याप्रमाणात असल्याने त्यांच्या विकासासाठी अल्पसंख्यांक आयोगामार्फत शासनाकडे विविध मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे आयोगाचे उपाध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी आज सांगितले.
अल्पसंख्यांक समाजातील विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्थाचालक तसेच शिक्षण विभागाची सुभेदारी विश्रामगृह येथे श्री. अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. यावेळी श्री. अभ्यंकर बोलत होते.
औरंगाबाद जिल्ह्यातील मुस्लिम बहुल क्षेत्र, अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ करण्यात याव्यात. जिल्ह्यात उर्दु शाळेच्या प्राथमिक विभागातील १०४ रिक्त पदे तत्काळ भरावीत. भारत सरकारने औरंगाबादेत मुलींचे वसतीगृह उभारले अगदी त्याचप्रमाणे मुलांचे वसतीगृह उभारावे. शासनाच्या अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या योजना पात्र लाभार्थीपर्यंत पोहोचाव्यात. मराठी फाऊंडेशन वर्गातील शिक्षक, विद्यार्थी संख्येनुसार मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक, शिपाई यांची नियुक्ती करण्यात यावी. उर्दु भाषांतरकार, उर्दु भाषक शिक्षकांच्या नेमणुकीचा विचार व्हावा आदी प्रकारच्या मागण्या अल्पसंख्यांक समाजातील व्यक्तींनी आज केल्या आहेत. या मागण्यांचा सकारात्मकदृष्टीने विचार करुन अल्पसंख्याकांच्या विकासाला आयोगाचे प्राधान्य आहे, आयोगामार्फत समाजाच्या मागण्या शासनाकडे पाठविण्यात येतील. त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाहीही यावेळी श्री. अभ्यंकर यांनी दिली.
तसेच समाजाच्या विविध विषयासंदर्भात शिक्षण विभागाची बैठक घेऊन योग्य त्या सूचनाही श्री. अभ्यंकर यांनी शिक्षण विभागाला दिल्या. या बैठकीस शिक्षण विभागाचे सहायक संचालक बी.बी चव्हाण, उपशिक्षणाधिकारी (मा.) जी.एस. सुसर, काझी मोईनोद्दीन (मा.), निरंतर शिक्षणचे रणजीत राजपूत, आर, एम. जारवाल, एस.डी. पवार, अनिल सकदेव, के. व्ही. आंबुलगेकर, अनिल सकदेव आदींची उपस्थिती होती.
सुरुवातीला शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना, पदाधिकाऱ्यांनी श्री. अभ्यंकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मिर्झा सलिमा बेग, शेख मन्सूर, इब्राहिम पठाण आदींची उपस्थिती होती