बंद

सरस प्रदर्शनासह अजिंठा महोत्सवाचे परिपूर्ण नियोजन करावे – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

प्रकाशन दिनांक : 20/04/2022

औरंगाबाद, दि.19, (विमाका) :- ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत बचतगट समूहाच्या उत्पादनांची विक्री आणि प्रदर्शन करणाऱ्या ‘सरस प्रदर्शनाचे’ आयोजन मे महिन्यात अजिंठा येथे होणार आहे. त्याच कालावधीमध्ये अजिंठा महोत्सवाचे ही आयोजन करण्यात येणार आहे. या दोन्ही उपक्रमांचे परिपूर्ण नियोजन करण्याच्या सूचना महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित यंत्रणांना आज येथे दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात सरस प्रदर्शन, अजिंठा महोत्सवाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत राज्यमंत्री बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, नगराध्यक्ष समीर सत्तार, उपायुक्त जगदिश मणियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संगीता पाटील यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या अजिंठा लेणी परिसरात सरस प्रदर्शन आणि अजिंठा महोत्सवाचे आयोजन केल्याने पर्यटनास चालना, स्थानिकांना रोजगार संधी आणि लेणीस व्यापक प्रसिद्धी मिळेल. त्या दृष्टीने हे दोन्ही उपक्रम मे महीन्यात अजिंठा येथे घेयायचे आहे. ते यशस्वीपणे राबविण्यासाठी महसूल, ग्राम विकास विभागाने सरस प्रदर्शनाचा तर पर्यटन आणि महसूल विभागाने अजिंठा महोत्सवाचा परिपूर्ण आराखडा तयार करण्याचे सूचीत करुन श्री. सत्तार यांनी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महोत्सव समिती स्थापन करून नियोजनात पोलिस, वैद्यकीय, नगरपालिका, अग्निशमन, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण यासह इतर सर्व यंत्रणांच्या सहभागातून विविध संयोजन समित्या स्थापन कराव्यात. याठिकाणी येणाऱ्या बचतगट समूहाच्या सदस्य, महोत्सवात सहभागी कलाकार, पर्यटक, प्रेक्षक या सर्वांच्या राहण्याची, जेवणाची, दळणवळणाची, सुरक्षा आणि इतर पूरक सुविधांची परिपूर्ण व्यवस्था ठेवणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने अधिक काटेकोरपणे सर्व नियोजन करून सरस प्रदर्शन आणि अजिंठा महोत्सव यशस्वी करण्याच्या सूचना राज्यमंत्री यांनी संबंधितांना दिल्या.

त्याचप्रमाणे फर्दापूर येथे पाणी टंचाईच्या अनुषंगाने टंचाई निवारणाच्या उपाययोजना संबंधितांनी तात्काळ करण्याचे निर्देशित करुन श्री. सत्तार यांनी सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघातील विविध कामासंदर्भा सोबतच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, महसूल कर्मचाऱ्यांचे निवासस्थान,उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड व ग्रामीण रुग्णालय सोयगांव यांच्या श्रेणीवर्धनाचा बांधकामाचा प्रस्ताव, पंचायत समिती सिल्लोड-सोयगाव कर्मचारी निवासस्थान, -मुर्डेश्वर सिध्देश्वर (मोठया) आराखडयात 2 ते 25 कोटी समावेश करणे, नॅशनल हायवे रस्त्यासंबंधीच्या कामाबाबत सविस्तर आढावा घेऊन संबंधित यंत्रणांनी तत्परतेने सर्व बाबींवर कार्यवाही करण्याच्या सूचना राज्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.