मका पिकावर नव्याने आलेल्या अमेरिकन लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करा – जिल्हाधिकारी उदय चौधरी
प्रकाशन दिनांक : 08/07/2019
औरंगाबाद, दिनांक: 29 (जिमाका) – मका पिकावरील लष्करी अळी अत्यंत विध्वंसक कीड आहे. आफ्रिका खंडासह संपूर्ण भारत, चीन, फिलिपाईन्स या देशामध्ये या किडीने मोठा प्रकोप केला आहे. यामुळे मक्याचे २० ते ६० टक्के नुकसान झाल्याच्या नोंदी आहेत. या किडीचा प्रसार वेगाने होण्यासाठी विविध बाबी कारणीभूत आहेत. तेव्हा कृषी विभागाने सूचविलेल्या उपाययोजना तत्काळ अंमलात आणाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चौधरी बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार उपस्थित होते.
मका पिकांचे दर दोन दिवसांनी निरीक्षण करावे. सर्व उपाययोजनांचा एकात्मिक पद्धतीने अवलंब केल्यास मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे व्यवस्थापन करून मक्याचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याने व गावाने सामुहिक स्वरुपात सर्व उपाय अवलंबविल्यास किडीच्या संख्येवर नियंत्रण मिळवून संभाव्य मोठे नुकसान टाळता येईल, असे आवाहन कृषी विभाग व जिल्हा परिषद, औरंगाबाद व जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले. अमेरिकन लष्करी अळीची प्रवास क्षमता किडीचा पतंग एका रात्रीत १०० किमी तर १५ दिवसात २००० किमी प्रवास करतो. यामुळे दुर्गम भागातील मका पीक शोधून तेथे सुद्धा अंडी घातले जात असल्याने अशा ठिकाणी सुद्धा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तर प्रजनन क्षमता या किडीचा मादी पतंग एकावेळी २००-३०० अशा पद्धतीने ७ ते ८ वेळा २००० अंडी देते. यामुळे किडीच्या संख्येत अल्पावधीत प्रचंड मोठी वाढ होऊन प्रादुर्भाव लवकर पसरत आहे. अनेक पिकांवर उपजीविका ही कीड ८० प्रकारच्या वनस्पतीवर जगू शकते. या किडीचे मका आवडते पीक असून या शिवाय ज्वारी, ऊस, गहू व इतर पिकांवर उपजीविका करू शकते. यामुळे ही कीड जास्त काळ सुप्त अवस्थेत न जाता हिचा जीवनचक्र कायम चालू राहतो व एका वर्षात ७ ते ८ पिढ्या होत असल्याने यांची संख्या भौमितिक पद्धतीने वाढत जाते.
वैजापूर तालुक्यातील संवदगाव, लोणी बु., औरंगाबाद जिल्ह्यातील चौका, खुलताबाद मधील गदाना, सालुखेडा, कन्नडमधील रिठ्ठी या गावांमध्ये लष्करी अळींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. काही ठिकाणी चाऱ्यासाठी मका लवकर लावलेली आहे. तर काही ठिकाणी मका पिकाची लागवड ७ ते ११ जून दरम्यान झालेल्या अवकाळी पावसावर करण्यात आली होती. म्हणजेच लागवड केल्यानंतर ८ ते १० दिवसांत मक्यावरील लष्करी अळींचा पतंग मक्याच्या पहिल्या पानावरील रोपावर अंडी देत आहे. तेथून पुढे २-३ दिवसात अळींची पहिली अवस्था बाहेर पडली आहे. पुढील ४-५ दिवसात अळी दुसरी अवस्था पार पडते. म्हणजेच १८-१९ दिवसांनतर ही अळी तिसरी अवस्था पार करते व नियंत्रणासाठी काहीशी अवघड ठरत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील दिनांक २२ जूनपासून सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे. दिनांक २४ जूननंतर लागवडी सुरु झाल्या आहेत. सद्यस्थितीत काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत, तर काही शेतकरी अद्याप पेरणी करताहेत. ज्या भागात पेरणी झाली आहे, तेथे मका पीक २-४ दिवसांचे असून उगवून येत आहे. हे पीक ५-६ दिवसात पहिल्या पानावर आल्याबरोबर ह्या पहिल्या पोंग्याबरोबर पानांवर पतंग अंडी घालून तेथून पुढे ७-९ दिवसात ह्या मका पिकावर अळींची पहिली अवस्था पाने खरवडून खाण्यास सुरुवात करेल.
ज्या शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली नसेल त्यांनी सायन्ट्रॅनिलीप्रोल ह्या १९.८% + थायोमिथॉक्झॅम १९.८% या कीडनाशकाची बीज प्रक्रिया केलेले बियाणे खरेदी करावे. जर विना बीज प्रक्रिया बियाण्यास बीज प्रक्रिया करून लागवड करावी. बीज प्रक्रिया केलेल्या बियाण्यांवर अद्याप प्रादुर्भाव येत नसल्याने निदर्शनास येत आहे. तसेच मक्यावर आत्ताच तत्काळ फवारणी करणे आवश्यक आहे. मका पीक उगवून येताच पहिल्या पोंग्यावरील पान बाहेर पडल्याबरोबर मक्याचे रोप घरच्या घरी तयार केलेल्या ५ टक्के निंबोळी अर्काची व बी.टी. या जैविक कीटकनाशकासह २० ग्रॅम प्रती १० लि. पाणी किंवा मेटा. हायझीयम नोमुरीया, बिव्हेरिया ह्या बुरशीजन्य कीटकनाशकासह ४० ग्रॅम प्रती १० लीटर पाणी अशी प्रतिबंधात्मक फवारणी करावी. कीटकनाशकाचा वापर अकिफायतशीर ठरू शकतो म्हणून ही फवारणी करावी. ज्यांना रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावयाची आहे, त्यांनी इमामेक्टीन बेन्झोएट ५% – ४ ग्रॅम प्रती लिटर पाणी, थायोमिथॉक्झॅम १२.६०% + लैमडा सायहॅलोथ्रीन ९.५०% – ५मिली प्रती १० लिटर पाणी, क्लोरअन्ट्रॅनिलीप्रोल १८.५% – ४ मिली प्रती १० लिटर पाणी, स्पीनोसॅड-३ मिली प्रती लिटर पाणी या कीटकनाशकापैकी कुठल्याही एका किडनाशकाची फवारणी करावी.
सध्यस्थितीमध्ये ही कीड पतंग अवस्थेत असल्याने एकरी १५ कामगंध सापळे स्पोडोल्युरसह लावल्यास नर पतंग मारल्यास अंडी घालण्याचे प्रमाण कमी होऊन किडीची संख्या कमी करता येऊ शकते, सर्व शेतकऱ्यांनी हे सापळे लावून मास ट्रॅपिंग करावे. लष्करी अळीचे पतंग निशाचर असून प्रकाशाकडे आकर्षित होत असल्याने या किडींचे पतंग प्रकाश सापळ्यात पकडून मारता येऊ शकतात. सगळ्या शेतकऱ्यांनी हे प्रकाश सापळे लावावेत. मक्याची लागवड पाऊस झाल्याबरोबर पुढील ७-१० दिवसात संपूर्ण गावाने आटोपून घ्यावी. मक्याची लागवड सर्व गावांमध्ये ५ जुलै पर्यंत आटोपून घ्यावी. त्यांनतर मक्याची लागवड करू नये. त्याऐवजी तूर, बाजरी इत्यादी पिकांचा विचार करावा. सलग मका पिकावर ह्या किडीला अंडी घालणे आवडत असल्याने मक्याच्या ४ ओळीनंतर तुर, मुग, उडीद या पिकाच्या २ ओळी घ्याव्यात. मक्याभोवती चवळीची लागवड केल्यास त्यावरील मावा खाण्यासाठी ढाल किडीसह इतर मित्र किडींची संख्या वाढवून नैसर्गिकरीत्या अळीचे चांगले नियंत्रण मिळण्यास मदत होते. जमिनीवर गुळाचे पाणी फवारल्यास मुंगळे आकर्षित होऊन अळ्यांचे नियंत्रण करतात तर पोंग्यात माती, वाळू व चुना ह्यासारखे पदार्थ ९:१ या प्रमाणात टाकल्यास अळ्या रोगग्रस्त होऊन मरतात, अशा प्रकारच्या उपाययोजना कराव्यात असे श्री. मोटे, श्री. गंजेवार यांनी सांगितले.
****
