बंद

बाजारसावंगीतील चारा छावणीमुळे पशुपालकांना मिळतोय दिलासा !

प्रकाशन दिनांक : 16/05/2019

औरंगाबाद, दि.13 (जिमाका) :  जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्याच्या बाजारसावंगी येथे शासनाच्यावतीने विद्यानंद सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या सहकार्याने चारा छावणी उभारण्यात आली आहे.  ही छावणी पशुपालकांना दिलासा देणारी ठरत आहे.     अपु-या पावसामुळे पडलेला दुष्काळ आणि या दुष्काळात जनावरांना जगवायचा पडलेला प्रश्न या चारा छावणीमुळे तात्पुरत्या स्वरुपात तरी मिटल्याचे पशुपालक म्हणतात.

जिल्ह्यात पशुंना चारा पाणी वेळेवर मिळावा, या  उद्देशाने शासनाने तातडीचे पावले उचलली. आवश्यक त्या ठिकाणी चारा छावणी सुरू केल्या. या चारा छावणीपैकीच बाजारसावंगीची चारा छावणी आहे. छावणीतील गुरा-ढोरांना मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध करून देण्यात येतो आहे. या छावणीत लहान मोठ्यांसह जवळपास 480 जनावरे सद्यस्थितीत दाखल आहेत.

विद्यानंद सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे छावणी पंडित मानाजी काटकर यांच्या शेतात उभारण्यात आलेली आहे. या ठिकाणी पशुपालकांच्या जनावरांना पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सिमेंटचे हौद देखील बांधलेले आहेत. त्यात पाण्याचा मुबलक साठा जनावरांसाठी असतो. आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी याठिकाणी जनावरे आणून ठेवत आहेत. याठिकाणी योग्यप्रकारे पशुंची निगा राखल्या जात असल्याचेही काटकर सांगतात. तर जनार्दन साहेबराव जाधव म्हणतात, मला एकूण सहा एकर शेती आहे. परंतु जनावरांना आवश्यक असणारा चारा शेतात अपु-या पावसामुळे पिकला नाही. त्यामुळे या चारा छावणीत जनावरे दाखल करावी लागली. शासनाच्या या छावणीत जनावरांना मुबलक प्रमाणात आणि वेळेवर चारा व पाणी मिळते आहे. चाळीस वर्षीय फकिरराव कामठे यांनी छावणी सुरू झाल्यापासून त्यांची तीन जनावरे या छावणीच्या दावणीला बांधलेली आहेत. त्यांची योग्य निगा याठिकाणी राखल्या जाते याचा त्यांना आनंद वाटतो. दिवसातून दोन वेळा ऊसाची कुटी, पाणीही जनावरांना मिळते, असेही ते सांगतात. सहा जनावरे घेऊन बाजार सावंगीचेच 33 वर्षाचे तरुण गजानन नलावडे यांनी धरण उशाला आहे परंतु कोरड घशाला असल्याचे सांगितले. तरीही याचा विचार न करता या छावणीचा त्यांच्यासह आजूबाजूच्या परिसरातील पशुपालकांना लाभ होतो आहे. या छावणीमुळे जनावरांच्या चारा – पाण्याचा प्रश्न मिटला आहे, असेही ते म्हणतात. कनकशीळचे मनोहर दांडेकर यांनीही असेच सांगितले. दोन वेळा माझ्या एकूण चार जनावरांना छावणीत चारा मिळतो. तोही वेळेवर. पाण्याची सोयही उत्तमप्रकारे आहे. सरकारी डॉक्टर दररोज येऊन जनावरांची तपासणीही करतात, असे शेकू पांडुरंग काटकर सांगतात.

 दुष्काळात एवढ्या बाबी सत्वर व तत्काळ भेटणे खूप महत्त्वाचे आहे आणि ते मिळते आहे, याचा शेतकऱ्यांना, पशुपालकांना आनंद  मिळतो आहे, असेच येथे दाखल केलेल्या पशुपालकांना वाटते, असाच सामुहिक सूर या छावणीवर पहावयास मिळतो.

*******

औरंगाबाद-बाजारसावंगीतील चारा छावणीमुळे पशुपालकांना मिळतोय दिलासा !