नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड
प्रकाशन दिनांक : 07/10/2021
औरंगाबाद, दिनांक 06 (जिमाका) : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बळीराजाला जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी प्रशासनाने शासनाकडे लवकरात लवकर प्रस्ताव द्यावा. या प्रस्तावाच्या माध्यमातून शेतक-यांना वाढीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबतची आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत हेाते. यावेळी आमदार सर्वश्री हरीभाऊ बागडे, अतुल सावे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नीलेश गटणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड पुढे म्हणाले की, मी नुकतीच जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. खुलताबाद, कन्नड, वैजापुर भागात अधिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते, पुल वाहुन गेले असून बंधाऱ्यांची देखील दुरावस्था झालेली आहे. ऊस, सोयाबीन, कापुस, मका अशा अनेक पिकांचे नुकसान झालेले आहे. सर्व नुकसानीचे पंचनामे करुन शासनाला प्रस्ताव पाठवावा. शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही श्री कराड यांनी दिली.
आमदार हरीभाऊ बागडे यांनी बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती पाहुन पंचनामे करावेत, जेणेकरुन पुढील पीक घेण्यासाठी शेतक-यांना मदत होईल, असेही ते म्हणाले.
आमदार अतुल सावे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे अनेक गावांत आजही वीजेचे संकट कायम आहे. पावसामुळे अनेक गावांतील विहीरीतले पाणी दुषित झालेले आहे, घरांची पडझड झालेली आहे यावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात असे सुचविले.