बंद

जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज

प्रकाशन दिनांक : 24/05/2019

औरंगाबाद, दि.21 (जि.मा.का.) :-  औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेल्ट्रॉन येथील इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी 7 वाजता उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षीत कक्ष (स्ट्राँग रुम) उघडला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीला 8 वाजता सुरूवात होणार असून प्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार आहे. 8.30 वाजता सर्व ईव्हीएम मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात होणार असून एकूण 26 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामध्ये मतदारसंघ क्रमांक (कंसात फेऱ्यांची संख्या)  105-(26), 107 (24), 108 (25), 109 (23), 111 (23), 112 (25) याप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीसाठी आयोगाने दोन निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली असून विधानसभा मतदारसंघ क्रमांक 105, 107, 108 या मतदारसंघासाठी ब्रजमोहन कुमार यांची तर विधानसभा मतदारसंघ क्रमांक 109, 111, 112 या मतदारसंघासाठी देवेंद्र सिंग यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मतमोजणी प्रक्रियेत 130 मतमोजणी सहायक, 137 मतमोजणी पर्यवेक्षक, 132 सुक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक मतदारसंघासाठी 14 याप्रमाणे 6 मतदारसंघांसाठी 84 टेबलवर 26 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया करण्यात येणार आहे. ईव्हीएमच्या मतमोजणीनंतर मा.भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार व्हीव्हीपॅट मधील मतपत्रिकांची मोजणी करण्यात येणार आहे.

यावर्षी 4775 टपाली मतपत्रिका निर्गमित करण्यात आल्या असून आतापर्यंत 2112 टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये 992 सैनिकांच्या मतपत्रिका असून उर्वरीत मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मतपत्रिकांचा समावेश आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांच्या अधिपत्याखाली सुमारे 300 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.  

 

*******