जल जीवन मिशन योजना जिल्ह्यात यशस्वीरित्या राबवा – केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड
प्रकाशन दिनांक : 23/05/2022
औरंगाबाद, दि.21, (विमाका) :- जल जीवन मिशन योजने अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘हर घर नल, हर घर जल’ या योजनेच्या बिद्रवाक्याप्रमाणे पाणी पोहचविण्याकरीता हे मिशन यशस्वीरित्या राबविण्याच्या सूचना केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत कामासंदर्भात आढावा बैठक डॉ.कराड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच उपविभागातील सर्व उपअभियंते यांची उपस्थिती होती.
डॉ.कराड म्हणाले की, जल जीवन मिशन योजने अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात पाणी पुरवठा होण्याकरीता सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी योजना यशस्वीरित्या राबविण्याकरीता समन्वयाने काम करावे. या योजनेकरीता केंद्राकडून आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार असून जिल्ह्याप्रमाणे संपूर्ण राज्यातील गावांमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा कसा करता येईल हे पहावे, असे सांगून डॉ.कराड यांनी जिल्ह्यात सुरू असलेली वॉटर ट्रिटमेंट प्लांटची माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर पाणी पुरवठा संदर्भात लवकरच दिशा समितीची बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना दिल्या. त्याचबरोबर जायकवाडी धरण आणि हर्सूल तलाव येथे तंरगते सौरऊर्जा प्रकल्प लवकरच तयार करण्यात येणार असून या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना अत्यल्प दरात वीज मिळेल तसेच पाण्याचे बाष्पीभवन होण्यास अटकाव होऊन दुहेरी लाभ होणार असल्याचे डॉ.कराड यांनी सांगितले.
जल जीवन मिशन करीता 45% केंद्र शासन, 45% राज्य शासन, आणि 10% ग्रामपंचायत अंतर्गत निधी खर्च करण्यात येणार असून जिल्ह्यातील 71% गावांचा जल जीवन मिशन जिल्हा कृती आराखडा तयार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी जल जीवन मिशन अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्याचा कृती आराखड्याचे पीपीटीद्वारे सादरीकरण करताना प्राथमिक आराखड्यानुसार ‘अ’ वर्गवारीत 341, ‘ब’ वर्गवारीत 495 तर नव्याने प्रस्तावित योजनेत 409 योजना प्रस्तावित असून 113 सोलार प्रस्तावित योजनांबाबत माहिती दिली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाअंतर्गत पैठण, वैजापूर, गंगापूर, केळगाव, सिरसाळा तालुक्यातील गावांमध्ये ग्रीड WWS करीता टेंडर प्रोसेस चालू असल्याची माहितीही श्री.गटणे यांनी यावेळी दिली.