बंद

हॉटेल्स/फुड कोर्टस/रेस्टॉरंट्स्‍ आणि बार रात्री दहापर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी

प्रकाशन दिनांक : 09/10/2020

औरंगाबाद,दि, 08 :- (जि.मा.का.) कोवीड -19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून औरंगाबाद जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांच्याव्दारा फौजदारी  दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1) (3)  अन्वये औरंगाबाद जिल्ह्यात (पोलीस आयुक्त शहर औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) 31 ऑक्टोबर 2020 चे  24 वाजेपर्यंत मनाई आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व वाणिज्यक आस्थापना,दुकाने दिनांक 22 सप्टेंबर 2020 रोजी पासून सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालू ठेवण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे शासन आदेशान्वये हॉटेल्स, फूड कोर्टस, रेस्टॉरंट्स आणि बार दि. 5 ऑक्टोबर 2020 पासून 50 टक्के क्षमतेसह चालू करण्यास परवानगी देण्यात आलेली असून त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना देखील निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने हॉटेल आस्थापना यांना देखील वेळ ठरवून देण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील हॉटेल्स, फूड कोर्टस, रेस्टॉरंट्स आणि बार या आस्थापना या आदेशाच्या दिनांकापासून सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालू राहतील. उर्वरित सर्व वाणिज्यक आस्थापना, दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालू राहतील.

तसेच जिल्हादंडाधिकारी यांनी यापूर्वी  निर्गमित केलेले आदेश यथस्थिती कायम राहतील. सदर आदेशाचे पालन न करणा-या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांचे विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असे जिल्हादंडाधिकारी यांच्याद्वारे निर्गमित आदेशात नमूद आहे.