बंद

हवामान आधारीत फळपीक विमा योजनेत सहभागासाठी कृषी विभागाचे आवाहन

प्रकाशन दिनांक : 13/10/2020

औरंगाबाद,दि.12 (जिमाका):-पुनर्रचित हवामान आधारीत फळ पीक विमा योजनेत डाळिंब, द्राक्ष, मोसंबी, केळी व आंबा पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबई विमा कंपनी काम करणार आहे. शेतकऱ्यांनी फळपिकांच्या हवामान धोक्यांची माहिती करुन घेऊन विहित मुदतीत नजिकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक, वित्तीय संस्था यांच्यांशी संपर्क साधून योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. आंबिया बहार सन 2020-21 मध्ये फळ पीक निहाय योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत द्राक्षासाठी  15 ऑक्टोबर, मोसंबी,केळीसाठी 31 ऑक्टोबर,आंबा, डाळिंबासाठी 31 डिसेंबर आहे.

योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे कुळाने,भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. आंबिया बहारातील गारपीट या हवामान धोक्यासाठी अतिरिक्त विमा संरक्षण देण्यात येते. त्यासाठी अतिरिक्त विमा हप्ता शेतकऱ्यांना देय आहे. जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी 4 हेक्टर क्षेत्र विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. द्राक्ष या फळपिकाकरीता योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर आहे. त्या दृष्टीने प्राधान्याने फळ पिकांच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे, इतर अधिसूचित फळ पिकांसाठीही संकेतस्थळ या आठवड्यातच कार्यान्वित करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कळवली आहे.