बंद

सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोनाबाधितांना घरीच विलगीकरण करणार – जिल्हाधिकारी उदय चौधरी

प्रकाशन दिनांक : 04/08/2020

औरंगाबाद, दि.3 (जिमाका) – नागपूर, अमरावती, पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर औरंगाबाद जिल्ह्यातही ज्या कोरोनाबाधित रुग्णांची मोठी घरे किंवा स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे, अशा कोरोनाबाधित रुग्णांना  घरीच विलगीकरण होता येणार असल्याची  माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींसोबत कोरोना परिस्थितीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खा. भागवत कराड,खा. इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, आ. अंबादास दानवे, आ. अतुल सावे, आ. प्रदीप जैस्वाल, मनपा आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार आदींची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले की, ज्या घरात सर्वच सदस्य हे सौम्य लक्षणे असणारे कोरोनाबाधित रुग्ण असतील आणि त्यांची  स्वतंत्र मोठी घरे आहेत तसेच ग्रामीण भागातही ज्यांच्या शेतात स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे, अशा सर्व कोरोनाबाधित रुग्णांना घरीच विलगीकरण होण्याचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने  प्रशासनावरील वाढलेला ताण कमी होण्यास मदत होईल व रुग्णांच्या दृष्टीने देखील सोईचे होईल असे सांगून श्री. चौधरी म्हणाले की, कोरोना संसर्गातून बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात 82 टक्के आहेत तर मृत्यू दर देखील कमी झाला आहे. तसेच नागरिकांमध्ये प्रतिकार शक्ती विकसीत होत असल्याने अँटी बॉडीज तपासणीसाठी सर्वेक्षण करुन चार ते पाच हजार निवडक चाचण्या करण्यात येणार आहेत.

या चाचण्यांची तपासणी घाटीतील प्रयोगशाळेत करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया दिल्लीच्या धर्तीवर राबविण्यात येणार आहे. या तपासणीसाठी वाळूज-बजाज महानगर, महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण असे तिन विभागांत विभागणी करण्यात आली आहे. या तपासणीसाठी रँडम सॅम्पलिंग पद्धतीने घटकांची निवड करण्यात येऊन वैज्ञानिक पद्धतीने तपासणीसह अभ्यास करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी लागणारे सॅम्पल जिल्हा परिषद, महानगरपालिका एकत्रित करुन प्रयोगशाळेस तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे श्री. चौधरी यावेळी म्हणाले.

या अभ्यासातून शहरात तसेच जिल्ह्यात कोरोनामुळे झालेला प्रादुर्भाव लक्षात येण्यास मदत होईल. तसेच प्रशासनाला सर्वेक्षणांती केलेल्या तपासणीतून पुढील दिशा ठरवण्यास मदत होणार आहे.  मनपा आयुक्त श्री. पांण्डेय म्हणाले की, शहरातील 115 वॉर्डमध्ये पथके तैनात करुन वेळेत गोळा केलेले सॅम्पल शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. या तपासणीच्या माध्यमातून  शहरातील सर्व घटकांची रँडमाईज पद्धतीने  तपासणी करण्यात येणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली.  यावेळी

खासदार भागवत कराड म्हणाले की, कोविड केअर सेंटर मध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या रोज भेटी देण्यावर भर द्यावा. जेणेकरुन रोजच्या भेटीने रुग्णांची केस हिस्ट्री समजण्यास मदत होऊन रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी होईल. तसेच घाटीच्या वैद्यकीय विभागातील रिक्त पदे  तात्काळ भरण्यात यावीत. ॲण्टीझन टेस्टींगमुळे RTPCR चाचणीचे प्रमाण कमी झाले आहे,ते वाढविण्यात यावे सद्यस्थितीत सुरू असलेले ॲण्टीजेन टेस्टींग सेंटर कायमस्वरूपी सुरु ठेवता येतील का याबाबत योग्य कार्यवाही करावी.

खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, घाटी रुग्णालयामध्ये मनुष्यबळाचा अभाव दिसून येत असून, तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी जेणेकरुन रुग्णांना अधिका – अधिक लाभ होण्यास मदत होईल. हर्सुल तलावची साठवन क्षमता वाढविण्यात यावी,यामुळे 12 वार्डातील पाणीटंचाई दूर होऊ शकते.

आमदार हरिभाऊ बागडे यांनी आंबेडकर चौक ते पिसादेवी हा रस्ता अपूर्ण असून तात्काळ रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली. रस्ते चांगले असल्यास कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात जाण्यास त्रास होणार  नाही असेही ते म्हणाले.  तसेच शहरातील रस्ते दुरुस्तीचीही मागणी केली. त्याचबरोबर फुलंब्री तालूक्यातील शेतकऱ्यांचा लवकरात लवकर मका खरेदी करण्याची मागणी केली.ग्रामीण भागातील कंटेन्मेंट झोनची व्याप्ती कमी करण्यात यावी पूर्ण गाव अथवा संपूर्ण मोहल्ला सील करण्यात येऊ नये.

आमदार अंबादास दानवे म्हणाले की, कोरोना या आजारात महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी जेणेकरुन या योजनेचा गरजुंना लाभ होईल.

आमदार अतुल सावे यावेळी म्हणाले की, औरंगाबाद मधील वाळूज येथील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधील कामगारांची अँटीजन टेस्टची संख्या वाढविल्यास कोरोनाबाधित कामगारांची संख्या नियंत्रणात येईल. परिणामी कारखानदाराला कंपनी बंद ठेवण्याची वेळ येणार नाही.

आमदार प्रदीप जैस्वाल यांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच कोविड केअर सेंटरमध्ये अधिक सुविधा देण्यात याव्या, हर्सुल तलावात आत्महत्येचे प्रकरण घडू नये यासाठी हर्सुल तलावाच्या भींतीच्या उंची वाढविण्यात यावी.रात्री उशिरापर्यंत काही नागरीक विनाकारण रस्त्यावर फिरत असतात,त्यांचेवर नियंत्रण आणावे अथवा पुन्हा टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन लागू करण्यात यावा.

सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोनाबाधितांना घरीच विलगीकरण करणार