सोयाबीन पिकांसाठी शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाचा सल्ला
प्रकाशन दिनांक : 22/09/2020
औरंगाबाद, दि.22 (जिमाका) :- मराठवाडा विभागातील सोयाबीनची पेरणी खरीप हंगाम 2020 मध्ये साधारणत: 15 ते 30 जून दरम्यान झालेली आहे. हे पीक सध्या शारीरिक पक्वतेच्या (शेंगा भरलेल्या ) अवस्थेत आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण, कमी सूर्यप्रकाश व पाऊस सुरु असल्यामुळे दिवसाचे तापमान 20 ते 25 डिग्री सेल्सिअस आहे व आर्द्रता 90 टक्क्यापेक्षा जास्त आहे.शारीरिक पक्वतेनंतर शेंगा वाळण्यासाठी व बियांमधील ओलावा कमी होण्यासाठी तापमान 30 ते 35 डिग्री सेल्सिअस असावे लागते, या काळात आर्द्रता 50 टक्क्यापेक्षा कमी असावी लागते. तसेच प्रखर सूर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश असावे लागते. परंतु सद्य परिस्थिती मध्ये ही साखळी विस्कळीत झालेली असल्यामुळे काही ठिकाणी सोयाबीनच्या उभा पिकातील शेंगामधील बियाण्याची उगवण झालेली आहे. ह शारीरिक व्यंग (physiological Disorder) असून सतत पडणाऱ्या पावसामुळे निर्माण झाले आहे यासाठी उपाय शेतामध्ये चर काढून पाण्याचा निचरा करावा व शेतामध्ये हवा खेळती ठेवावी.पाऊस थांबताच सोयाबीन पिकाची काढणी करुन काडाचे छोटे-छोटे ढीग करुन प्रखर सूर्यप्रकाशामध्ये शेतातच वाळवावे. त्यानंतर प्रादुर्भाव ,उगवण झालेल्या शेंगा बाजूला काढून मळणी करावी, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांनी दिला असल्याचे कृषी संचालकांनी कळवले आहे.