बंद

सायकल चालवणे आरोग्य, पर्यावरण दृष्ट्या लाभदायी -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 21/06/2021

  • योग दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःसायकल रॅलीत सहभागी होत केले आवाहन
  • योग दिनी विभागीय क्रीडा संकुलात कार्यक्रम
  • ऑलम्पिक पदक  विजेते जेष्ठ धावपटू पद्मश्री मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली

औरंगाबाद, दिनांक 20(जिमाका)- कोरोना जागतिक महामारी च्या काळात सर्वांना चांगले आरोग्य आणि पर्यावरण संतुलनाची जाणीव झाली आहे.तेव्हा प्रत्येकाने स्वतःपासून बदलाची सुरुवात करत आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी व्यायाम,योग याबरोबरच सायकल चालवणे देखील आरोग्य आणि पर्यावरण दृष्ट्या लाभदायी असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यावेळी म्हणाले. 

दि. 21 जून  2021 सातव्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाची जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण  यांच्या  प्रमुख उपस्थितीत आज सकाळी 7 वाजता क्रांतीचौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत  सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले,त्या वेळी ते बोलत होते.

 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जनजागृतीसाठी  जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत   आज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सायकल रॅलीचे समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंदार वैद्य ,जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे देखील सायकल रॅलीत सहभागी झाले होते.त्याचबरोबर  औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेचे अध्यक्ष निखिल कचेश्वर, सचिव चरण सिंग संगा, सहसचिव अतुल जोशी, स्केटिंग अकॅडमी चे भिकन आंबे, योग आणि स्पोर्ट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र वाणी, क्रीडा भारती महाराष्ट्र प्रदेशचे उदय कहाळेकर  तसेच रॅलीत सहभागी असलेले खेळाडू उपस्थित होते.

    यावेळी   जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की सायकल रॅलीत सहभागी होताना  आनंद होत आहे. रॅलीच्या माध्यमातून खेळाडूंनी स्वच्छतेचा, योग करण्याचा, पर्यावरण जनजागृतीचा जो संदेश दिला आहे,ज्या घोषणा दिला आहे त्या प्रत्यक्ष साकार करणेही  आवश्यक आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील पर्यावरण संतुलनासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करत आहे. त्या दृष्टीने आपण शहरात वेळोवेळी वृक्षारोपण,स्वच्छता उपक्रम   राबवत आहोत. सध्या शहराचे ग्रीन कव्हर चार ते पाच टक्केच आहे ते आपल्याला 33% करायचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावावीत. पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता मोहीमही वेळोवेळी राबवावीत. आणि कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नियमांचे पालन करावे. वेळोवेळी योग्यप्रकारे मास्क लावावा. उद्या 21 जून रोजी विभागीय क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे. तिथे गर्दी करण्यापेक्षा आहे तिथून योग करून त्यासंबंधीचे फोटो, व्हिडिओ पाठवावेत.त्यामधून उत्कृष्ट पद्धतीने योग सादर करणाऱ्यांना बक्षिसे दिली जातील,असे श्री. चव्हाण यावेळी म्हणाले.तसेच

सायकल रॅली समारोप प्रसंगी सर्वप्रथम  काल 91 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झालेले  दिवंगत ऑलम्पिक पदक  विजेते, जेष्ठ धावपटू पद्मश्री मिल्खा सिंग यांचे भारतीय क्रीडा क्षेत्रात अमूल्य योगदान आहे. त्यांचे हे योगदान भारतीयांसाठी कायमच प्रेरणादायी आहेत, असे सांगत मिल्खा सिंग  यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर ड्रॉ पद्धतीने सायकल रॅलीतील उत्कृष्ट सायकलपटूचे  प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांक काढून अनुक्रमे उमेश मारवाडी, अश्विनी जोशी,सोनम शर्मा या विजेत्यांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यानंतर राष्ट्रगीताने    सायकल रॅलीचा समारोप झाला.

सायकल चालवणे आरोग्य, पर्यावरण दृष्ट्या लाभदायी -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण