सातव्या आर्थिक गणनेचे काम तत्काळ पूर्ण करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशन दिनांक : 30/12/2020
औरंगाबाद, दिनांक 30 (जिमाका) : देशाच्या भौगोलिक सिमांतर्गत असलेल्या सर्व आस्थापनांची संपूर्ण मोजणी आर्थिक गणनेमध्ये करण्यात येते. यामध्ये सर्व उद्योग, व्यवसाय, सेवा यांची गणना प्रत्यक्ष घरोघरी कुटुंबास, उद्योगास भेट देऊन करण्यात येते. जिल्ह्यातही आर्थिक गणना सुरू असून या गणनेचे काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सातवी आर्थिक गणना 2019 च्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, प्र. जिल्हा सांख्यिकी अधिकारी नितीन पाटील, सीएससीचे (कॉमन सर्विस सेंटर) सुजित आहेर, नगर पालिकांचे मुख्याधिकारी आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी या आर्थिक गणनेच्या कामास प्राधान्य द्यावे. सर्व नगरपालिकांनी या गणनेसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ तत्काळ उपलब्ध करून गणनेचे काम पूर्ण करावे. प्रगणक, पर्यवेक्षक यांची तत्काळ नियुक्ती करावी. गणनेचे जिल्ह्यातील काम अचूक, गुणवत्तापूर्ण व विहित मुदतीत पूर्ण करावे. नागरी भागात सोयगाव, फुलंब्री, नगरपंचायत, सिल्लोड, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, नगर परिषदेने या कामास प्रथम प्राधान्य देऊन तत्काळ आर्थिक गणना पूर्ण करावी. ग्रामीण भागात गणनेचे काम उत्तम झाले असल्याचेही श्री. चव्हाण म्हणाले.
बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री. पाडील यांनी केले तर सीएससीचे श्री. आहेर यांनी आर्थिक गणनेची सद्यस्थिती बाबतची माहिती जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांना सादर केली.