बंद

सर्दी, ताप, खोकल्याची औषधे घेणाऱ्यांची माहिती औषध विक्रेत्यांनी नियमितपणे मनपाला द्यावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 28/08/2020

औरंगाबाद,दि.28 (जिमाका) – जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यामध्ये प्रत्येकाची भूमिका महत्वाची आहे. बऱ्याच ठिकाणी नागरिक सर्दी, ताप, खोकला, श्वसनाचा त्रास झाल्यास स्थानिक डॉक्टरांकडे दाखवून औषध खरेदी करतात. मात्र अशा लक्षणातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकारच्या त्रासासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन प्रमाणे औषध खरेदी करणाऱ्यांची माहिती औषध विक्रेत्यांनी नियमितपणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडे देण्याबाबत  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधितांना निर्देश दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना नियंत्रण बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सर्व यंत्रणांव्दारे कोरोना नियंत्रणाबाबत करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देशीत केले. बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, अतिरिक्त आयुक्त (मनपा) ब. भि. नेमाने, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रीता मेत्रेवार, वर्षाराणी भोसले, संगीता चव्हाण, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर, डॉ. शिवाजी भोसले, डॉ. विजयकुमार वाघ, डॉ. पी.एम. कुलकर्णी, यांच्यासह सर्व संबंधित वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे प्रयत्न करताना त्यामध्ये खासगी डॉक्टरांचा सक्रीय सहभाग वाढवण्याची आवश्यकता असल्याचे सांगून नागरिकांनी संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करणे, हाता वारंवार धुणे, सामाजिक अंतर राखणे या त्रिसुत्रीचा वापर करण्यासोबतच कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास, दुखणे अंगावर काढू नये, तातडीने नजीकच्या डॉक्टरांना दाखवावे, याबाबत यंत्रनांनी अधिक जनजागृती करावी. औषध विक्रेत्यांनी कुणालाही डॉक्टरच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय औषधे देऊ नये. तसेच सर्व औषध खरेदी करणाऱ्यांची नाव, संपर्क क्रमांक, पत्ता अशी माहिती ठेवावी.

      तसेच जिल्ह्यातील कोविड आणि नॉन कोविड रूग्णालय अशा सर्व रूग्णालयातील उपलब्ध खाटांची संख्या, तालुका आरोग्य अधिकारी यांनी ग्रामीण भागात राबवायच्या उपाययोजनात करावयाची वाढ याबाबत माहिती सादर करावी. तसेच कोरोना उपचारासाठी आवश्यक पीपीई किट, ॲम्बुलन्स, औषधे, रॅमडिसेवीर, टोसीझुलॅब इंजेक्शन्सची उपलब्धता याबाबत माहिती घेऊन सर्व रूग्णालयांनी ही इंजेक्शन्स उपलब्धता किती आहे याबाबतची माहिती रूग्णालयांच्या नोटीस बोर्डवर दर्शनी भागात लावावी, असे निर्देशही श्री. चव्हाण यांनी यावेळी संबंधितांना दिले. परिस्थितीत सुधारणा होण्याच्या दृष्टीने अधिक सुव्यवस्थितपणे काम करण्याची आवश्यकता असून सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयातून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी यापुढेही जोमाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

सर्दी, ताप, खोकल्याची औषधे घेणाऱ्यांची माहिती औषध विक्रेत्यांनी नियमितपणे मनपाला द्यावी - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण