बंद

संसर्ग वाढीच्या प्रमाणात अतिरिक्त उपचार सुविधांसह यंत्रणांनी सज्ज रहावे – पालकमंत्री सुभाष देसाई

प्रकाशन दिनांक : 25/03/2021

  • चाचण्यांमध्ये भरीव वाढ करावी.
  • औषधे तसेच अन्नधान्य पुरवठा सुरळीत ठेवावा.

औरंगाबाद,दि.25 (जिमाका) –जिल्ह्यातील कोरोनाच्या झपाट्याने पसरत असलेल्या संसर्गाला तातडीने रोखण्यासाठी चाचण्यांमध्ये भरीव वाढ करत सर्व यंत्रणांनी रूग्णसंख्येच्या वाढत्या प्रमाणात अतिरिक्त उपचार सुविधांसह सज्ज रहाण्याचे निर्देश उद्योग, खनिकर्म मंत्री तथा औरंगाबाद जिल्‌ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यंत्रणांना निर्देशित केले, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या काळात हा संसर्ग अधिक वाढणार असल्याचा धोका लक्षात घेऊन गर्दी रोखण्यासाठी प्रत्येक विभागाने अधिक खबरदारीने, तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वाढ करण्याचे निर्देशित केले. कोणत्याही परिस्थितीत रूग्णांना चांगले उपचार मिळालेच पाहीजे, त्यासाठी आवश्यक ते सर्व करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने रूग्णांचे वेळेत निदान होऊन संसर्गाला जागीच रोखण्यासाठी भरीव प्रमाणात कोरोना चाचणी केंद्र 500 पर्यंत वाढवून 10 हजारांपर्यंत चाचण्यात वाढ करावी. शहरी, ग्रामीण सर्व ठिकाणी पर्याप्त खाटा, अत्यावश्यक उपचार सुविधा, सज्ज ठेवाव्यात. तसेच ज्या-ज्या ठिकाणी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्या ठिकाणी अधिक सतर्कतेने बंधने वाढवुन परिस्थिती नियंत्रणात आणावी. औषधांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात ठेवावी. तसेच वाजवी दरात नियमानुसार त्यांची विक्री होण्यावरही कटाक्षाने नियंत्रण ठेवावे. जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात ऑक्सीजन उपलब्धता आहे, ही समाधानाची बाब असून वाढीव व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असून लवकरच ते प्राप्त होतील, असे श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

तसेच कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम यशस्वी होणे गरजेचे असून 45 वर्षांवरील सर्वांना लस देण्याची राज्य शासनाची मागणी केंद्राने मान्य केली असून त्या दृष्टीनेही वाढीव लसीकरण केंद्राची सुविधा सज्ज ठेवत जिल्ह्यात लसीकरणाचे उद्दीष्ट पुर्ण करण्याचे सूचित करून श्री. देसाई म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत जनतेचा रोजगार, उत्पन्न बंद होऊ नये ही शासनाची भूमिका आहे. मात्र त्यासोबतच कोरोनाला रोखणे ही प्राथमिकताही आहे. याचा समतोल साधत वाढता संसर्ग रोखण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. ते यशस्वीरित्या पेलण्यात यंत्रणांची सक्रियता महत्वाची असून पहिल्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन दुसरी लाट थोपवण्याच्या जबाबदारीतून सर्वांनी आपली कार्यक्षमता वाढवण्याचे सांगून शासन आवश्यक निधीसह सर्व प्रकारचे सहाय्य जिल्ह्याला उपलब्ध करून देईल, असे श्री. देसाई यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत असून जिल्ह्याचा रूग्ण बाधितांचा दर 17.99 टक्के इतका असून 1 फेब्रुवारी ते 23 मार्च पर्यंत जिल्ह्यात 134239 चाचण्या झाल्या आहेत. जिल्ह्याचा रूग्ण बरे होण्याचा दर 79.06 टक्के तर मृत्यू दर 0.93 असल्याचे सांगून श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यात शहरालगतचा भाग, नगरपालिका क्षेत्र, आठवडी बाजार, लोकसंख्येची घनता अधिक असेलेली ठिकाणे आणि औद्योगिक भागात रूग्ण वाढत असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक उपायांसह जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात 128 उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून राज्य शासनाच्या सूचनांनूसार पर्याप्त प्रमाणात अत्यावश्यक उपचारांसह खाटांची संख्या वाढवण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने सर्व खासगी तसेच शासकीय रूग्णालयांना सूचना दिल्या असल्याचे सांगून श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यात 99 केंद्रांवर लसीकरण सुविधा असून 3940 कोविशिल्ड, कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहेत. तसेच 104 केंद्रांवर कोरोना चाचण्यांची सुविधा असून जिल्ह्यात यंत्रणांमार्फत संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रभावीरित्या अंशत: लॉकडाऊन राबवण्यात येत असून रात्री 8 ते सकाळी 5 या कालावधीत जारी करण्यात आलेल्या कर्फ्युचेही काटेकोर पालन करण्यात येत आहे. त्यासोबत यंत्रणांमार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना, ऑक्सीजनसाठा, औषधांची उपलब्धता, लसीकरण, यासह सर्व प्रतिबंधात्मक उपायांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.

पोलीस आयुक्त श्री. गुप्ता यांनी संसर्ग रोखण्यासाठी मनाई आदेश जारी केले असून त्याचे पालन न करणाऱ्या 90 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून कर्फ्यू कालावधीनुसार रात्री 8 नंतर विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची कडक तपासणी केली जाणार असल्याचे यावेळी सांगितले.

मनपा आयुक्त श्री. पाण्डेय यांनी शहरात चाचण्या, उपचार सुविधांमध्ये तसेच सीसीसीमध्ये मोठ्या संख्येने वाढ करण्यात येत असून महाविद्यालय वसतीगृहे, मंगल कार्यालये या ठिकाणी देखील सीसीसी सुविधा तयार ठेवण्यात येत असल्याचे सांगून कोणत्याही परिस्थितीत पर्याप्त खाटा सीसीसीमध्ये उपलब्ध राहतील. तसेच गृहविलगीकरण सुविधेसाठी रूग्णालयांसाठी प्रतिदिवस रू. 200 शुल्क निश्चित केल्याचे सांगितले.

डॉ. गोंदावले यांनी दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात संसर्ग वाढत असून त्याप्रमाणात तातडीने ग्रामीण भागातील सीसीसी तसेच डीसीएचसीमध्ये मोठ्या संख्येने खाटा सज्ज ठेवण्यात येत आहे. तसेच 50 पेक्षा जास्त रूग्ण असलेल्या 50 गावांमध्ये कन्टेनमेंट झोनच्या नियमावलीने प्रतिबंधात्मक उपाय राबविले जात असून प्रतिदिवसाच्या चाचण्यात वाढ करण्यात आली आहे. तसेच ग्रामीणमध्ये 66 केंद्रांवर लसीकरण सुविधा उपलब्ध आहे. त्यात अजून वाढ करत ग्रामीण रूग्णालये, उपरूग्णालयातही लसीकरण सुविधा देण्याचे नियोजन असल्याचे सांगून चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.

पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील यांनी ग्रामीण भागात अंशत: लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड वसूली, मास्क वाटप, जनतेला समजावून सांगणे यांसह प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पोलीस अधिकारी, कर्मचारी प्रतिबंधात्मक उपाय राबवत असून ग्रामीण पोलीस यंत्रणेतील सर्वांचा लसीकरणाचा पहिला डोस पुर्ण झालेला आहे. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इतर विभागांना लागणारी पोलीसांची कुमक पर्याप्त प्रमाणात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ग्रामीण पोलीस यंत्रणेला होमगार्डचे सहकार्य उपलब्ध करून द्यावे, असे श्रीमती पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विविध विभागांमार्फत करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक कार्यवाहीची माहिती संबंधित विभाग प्रमुखांनी दिली.

संसर्ग वाढीच्या प्रमाणात अतिरिक्त उपचार सुविधांसह यंत्रणांनी सज्ज रहावे