बंद

संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर उपचार सुविधांसह यंत्रणा सज्ज -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 12/04/2021

  • ऑक्सीजन वापर आरोग्य क्षेत्रासाठी प्राधान्याने

औरंगाबाद, दिनांक 12(जिमाका)-जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी  चाचण्यांमध्ये भरीव वाढ  करण्यात येत असून संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर उपचार सुविधांसह यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे  सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके, आ. हरीभाऊ बागडे, आ. अंबादास दानवे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. अतुल सावे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक  मोक्षदा पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, घाटीच्या डॉ. वर्षा रोटे, यांच्यासह सर्व संबंधित प्रमुख, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी  यांनी जिल्ह्याचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा दर 17.8 तर पॉझिटिव्हीटीचे प्रमाण 19.56 आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर 82.41 टक्के इतका आहे.  जिल्ह्यात 192 उपचार सुविधामध्ये वीस हजार पाचशे दहा खाटा उपलब्ध असून कोरोना चाचण्यांचे दोन नवीन यंत्र प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एक घाटी प्रयोगशाळेस तर दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेस उपलब्ध  करुन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अजून एक यंत्र मिळणार असल्याने कोरोना चाचण्या वाढीव प्रमाणात करण्यात येणार असल्याचे सांगून सध्या औरंगाबादसह इतर जिल्ह्यातील स्वॅब तपासणी ही जिल्ह्यात होत असून आता दहा हजारांच्यावर चाचण्या करण्यात येणार आहे जेणेकरुन वेळेत रुग्णाचे निदान होऊन सुस्थितीत त्याच्यावर योग्य उपचार करता येईल. त्यासोबतच त्या बाधीत रुग्णांपासून होणारा संसर्ग वेळेत रोखता येईल. त्यादृष्टीने मोठ्या प्रमाणात ग्रामीण, शहरी  सर्व  भागात चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले. पर्याप्त प्रमाणात उपचार सुविधा, ऑक्सीजन खाटा, रेमडीसीवीर इंजेक्शन याबाबींचे  नियोजन करण्यात येत असून जिल्ह्यात मुबलक ऑक्सीजन साठा उपलब्ध ठेवण्याची खबरदारी घेतल्या जात आहे. औद्योगिक वापरातील ऑक्सीजन साठा आरोग्य क्षेत्राच्या वाढीव मागणीनुसार उपलब्ध ठेवण्याच्या दृष्टीने राखीव ठेवण्याबाबतच्या सूचना उद्योगांना देण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन प्लांट, जम्बो सिलेंडर सुविधा, ऑक्सीजन पाईप लाईनचे काम घाटी, मेल्ट्रॉन, जिल्हा रुग्णालयासह  ग्रामीणमध्येही सुरु असल्याचे सांगून श्री. चव्हाण यांनी  लसीकरण मोहीमेची जिल्ह्यात चांगली अंमलबजावणी सुरु असून आता 45 वर्षावरील व्यक्तीनांही लस देण्यास सुरवात झाली आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आवश्यकतेनुसार लससाठा उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

डॉ. गोंदावले यांनी ग्रामीण भागात उपचार सुविधामध्ये वाढ केली असून खाजगी रुग्णालयांनाही सीसीसीची परवानगी दिली आहे. तसेच होम आयसोलेशनची सुविधाही ग्रामीणमध्ये सुरु करण्यात आली  आहे.  तरी जनेतेने चाचण्या करण्यासाठी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता मोठ्या संख्येने पुढे येणे गरजेचे आहे. जेणेकरुन वेळीच संसर्ग रोखणे आणि वेळेत उपचार घेणे शक्य होईल. तरी लसीकरण आणि कोरोना चाचण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने पुढे येण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनीधीनी त्यांच्या स्तरावरुन  जनतेला आवाहन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे डॉ. गोंदावले म्हणाले.

आ. दानवे यांनी कोरोना चाचण्यांचे अहवाल विहित वेळेत मिळण्याच्या दृष्टीने तसेच खाजगी रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या दरांवर प्रशासनाने नियंत्रण ठेवावे. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णाच्या हातावर शिक्के मारावेत. गंगापूरला तातडीने  ॲम्ब्यूलन्स  उपलब्ध करुन द्यावी. लसीकरणाचे गावनिहाय वेळापत्रक करावे. तसेच तालुक्यामध्ये सीसीसी सुविधा सुरु करण्यासाठी खाजगी रुग्णालयांकडून प्राप्त प्रस्तावातील  निकषांची पुर्तता तपासून मान्यता द्यावी. तसेच प्रस्तावात त्रुटी असल्यास संबंधितांना अवगत करावे, असे सूचीत केले.

आ. सावे यांनी मेल्ट्रॉनमध्ये तातडीने ऑक्सीजन व्यवस्था वाढवावी. लसीकरण मोहीमेत जनसहभाग वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती जाहिरातीच्या माध्यमातून करावी, असे सूचीत केले.

आ. जैस्वाल यांनी संचारबंदी कालावधीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच केवळ  रुग्णालय परिसरातील मेडीकल दुकाने  24 तास सुरु ठेवण्यास परवानगी देऊन शहरातील इतर भागातील मेडीकल दुकानांना निश्चित वेळमर्यादा घालून द्यावी जेणेकरुन औषधी खरेदीचे कारण देऊन बाहेर फिरणाऱ्यांवर प्रतिबंध घालता येईल, असे सूचीत केले.

जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन तत्परतेने दुरुस्त करण्याचे आ. बागडे यांच्यासह सर्व उपस्थित प्रतिनिधींनी सूचीत केले.

संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर उपचार सुविधांसह यंत्रणा सज्ज -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण