बंद

श्रीक्षेत्र घृष्णेश्वर आराखडा सर्व सुविधायुक्त तयार करावा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 20/07/2022

औरंगाबाद, दि. 19 (जिमाका) : घृष्णेश्वर मंदीर भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असून येथे दर्शनासाठी व पर्यटनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. भविष्यकालीन सुविधांच्या अनुषंगाने घृष्णेश्वर आराखडा समितीने सर्व सुविधायुक्त आराखडा तयार करावा, असे घृष्णेश्वर मंदीर प्रारंभिक आराखड्याच्या बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

उपजिल्हाधिकारी संगिता सानप, जिल्हा नियोजन अधिकारी राजेंद्र झुंजारे, जीवन प्राधिकरणाचे अजय सिंह, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. दरोली, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम नरसिंग भंडे, कार्यकारी अभियंता (विद्युत) एम.जी.भोसले, शाखा अभियंता खुलताबादचे श्री.शेळके, प्रादेशिक व्यवस्थापक एम.टी.डी.सी.चे प्रदीप देशपांडे, आरेखक दिलीप कोलते, उपविभागीय अधिकारी सां.बा. उपविभाग, विभागीय वन अधिकारी श्रीमती. जमदाडे यांची उपस्थिती होती.

सार्वजनिक बांधकाम, विद्युत, पाणीपुरवठा, वनीकरण, रस्ते विकास आणि इतर संबंधित विभागाने परिपूर्ण प्रारुप आराखड्यात आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधांचा अंतर्भाव करण्यात आला असल्याचे सांगितले. यामध्ये नवीन रस्ता अलाइनमेंट, पार्किंग, प्रवेशद्वार, सभामंडप वाहनतळ, शाँपिग कॉम्पलेक्स, प्रसादालय, भक्त निवास, दर्शन बारी, महिला व पुरुषासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा ,उद्यान, हस्तकला विक्रीसाठी दुकाने यांचा समावेश करण्यात आला आहे. भक्त निवासात 52 खोल्या आणि आठ डोर्म्सची रचना प्रस्तावित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे संरक्षण भिंत, पुरेशी प्रकाशव्यवस्था, हवा खेळती राहिल या दृष्टीने वेरुळ घृष्णेश्वर मंदीर विकास आराखड्यात समावेश करण्यात आला असून जिल्हा समितीने प्रारंभिक मान्यता आराखड्यास देण्यात येत असून उर्वरित कामांना गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बैठकीत दिले.

बीड बायपास येथील एम.आय.टी. जवळील रस्त्याचे उर्वरित काम प्राधान्याने पूर्ण करुन नागरिकांना चांगला रस्ता लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याच्या सूचना रस्ते बांधकाम व महावितरणाच्या अधिकाऱ्यांना श्री.चव्हाण यांनी दिल्या.

श्रीक्षेत्र घृष्णेश्वर आराखडा सर्व सुविधायुक्त तयार करावा