बंद

शेत मालाला अधिक भाव मिळायला हवा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 05/08/2021

वैजापुरातील विविध कामांचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

औरंगाबाद, दिनांक 4 (जिमाका)- स्व.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगत वैजापूर तालुक्यातील जांबरगावात वखार महामंडळाच्या वतीने ॲग्रो लॉजिस्टिक पार्क व कृषी समृद्धी केंद्र होत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला अधिक भाव मिळेल, अशी व्यवस्था उभारण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.

वखार महामंडाळाच्या या प्रकल्पात अधिक दर्जेदार काम करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.  याप्रसंगी जांबरगावात जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष दीपक तावरे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, सहव्यवस्थापकीय संचालक श्री. शिंगटे, श्री.रेळेकर, श्री.सैंधाने, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार राहुल गायकवाड यांची उपस्थिती होती.

वैजापूर नगर परिषदेच्या कामांची पाहणी 

वैजापूर नगर परिषदेने माझी वसुंधरा अभियानांतर्गत केलेल्या विविध कामांची पाहणी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केली. तसेच शहरातील साई पार्क आणि इंद्रनील सोसायटीत श्री. चव्हाण यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.  जलशुध्दीकरण प्रकल्पाचीही त्यांनी पाहणी केले. या प्रकल्प परिसरात लावण्यात आलेल्या बांबू लागवड आणि घनकचरा व्यवस्थापनाचीही त्यांनी पाहणी करुन योग्य त्या सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासमवेत दिनेश परदेशी, नगर परिषदेचे  सदस्य आणि मुख्याधिकारी बी.यू बिघोत उपस्थित होते. इंद्रनील सोसायटीत मान्यवरांच्या हस्तेही वृक्षारोपन करुन वसुंधरा वाचविण्यासाठी शपथ घेण्यात आली. इंद्रनील सोसायटीत खुल्या जागेवर नगर परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या घनवन प्रकल्पाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते करून वृक्षारोपण करण्यात केले .या ठिकाणी अडीच हजार झाडे लावण्यात येणार आहेत. वृक्षारोपनापेक्षा जास्त महत्त्व वृक्षसंवर्धनाला आहे म्हणून वृक्षांची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

उपविभागीय रुग्णालयास भेट 

वैजापूर उपविभागीय रुग्णालयास जिल्हाधिकारी चव्हाण यांनी भेट देऊन ऑक्सिजन पीएसए प्लांटची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एस.बी.काकर यांना  ऑक्सिजन प्लांटवरील पत्राची लांबी वाढवण्यासंदर्भात  सूचना केल्या.

अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करा 

वैजापुरात पंचायत समितीतील विनायकराव पाटील सभागृहात विविध विकास कामांचा आढावा जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी प्रत्येक विभागाने मानसी तीन वृक्ष लावावेत. सर्व कार्यालयाने सुंदर माझे कार्यालयासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

त्याचबरोबर नरेगा अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करावीत. मजुरांना वेळेवर मजुरी द्यावी. शेतात जाण्यास अडचण असल्यास शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. 

प्रधानमंत्री, शबरी, रमाई, पारधी आवास योजनेसाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. अपूर्ण घरकूल कामे तत्काळ पूर्ण करावेत.

बांधावरील वृक्ष लागवड यावर ग्रामपंचायतीने भर द्यावा. सर्व गावांमध्ये कोविड 19 मधील नियमावलीची गावपातळीवर जनजागृती करावी. प्रचार, प्रसारावर भर द्यावा.

नवजात बालक, शिशू हाताळण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घाटीत मनुष्यबळ पाठवावे, असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी निर्देश दिले.

 डॉ.गव्हाणे यांनी नवीन महसुली गावांचे अभिलेख स्वतंत्र करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाने कार्यवाही तीन महिन्यात पार पाडावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असल्यास प्रशिक्षण देण्यात येईल, असे सांगितले.

शेतकरी, पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घ्यावा. खरीप पीक कर्ज वाटपाचे काम पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सहकारी संस्था यांना दिले. यासाठी बँकर्सची बैठक घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

पाणीपुरवठा योजना, पथदिवेची वीज देयके भरण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीने  सहकार्य करावे.

शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबाला उभारी 2 मध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ, कुटुंबाची गरज ओळखून मदत देण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन चव्हाण यांनी केले.

बैठकीत पंचायत, कृषी, सामाजिक वनीकरण, रेशीम, वन, शेतकरी पाणंद  रस्ते, जलजीवन मिशन अंतर्गत पाणी वितरण व्यवस्था, कोविड लसीकरण, ब्रेक द चेन, महिलांसाठी आवश्यक सुविधा, एनए निश्चितीकरन, स्वच्छ पाणी पुरवठा आदींबाबत आढावा घेऊन योग्य त्या सूचनाही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

बैठकीस श्री. आहेर, श्री. गायकवाड, पोलीस उपअधीक्षक कैलास प्रजापती, तालुक्यातील गट विकास, विस्तार, शिक्षण, वैद्यकीय, सार्वजनिक, कृषी, वन, नगर पालिका, दुय्यम निबंधक, सहकारी संस्था, बाल विकास आदी विभागांचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

तहसील कार्यालयासाठी पर्यायी जागेची पाहणी 

तहसील कार्यालयासाठी वैजापूर शहरातील डेपो रोडवरील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची पाहणी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी करून तहसील कार्यालय स्थलांतरित करण्याची कार्यवाही करण्यासाठी आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. तहसील कार्यालयात कामात सुधारणा करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. माझे कार्यालय सुंदर कार्यालय संकल्पना, कार्यालयीन कार्यपद्धती व्यवस्थित राबवावी, असे आवाहन अधिकारी, कर्मचारी यांना श्री. चव्हाण यांनी केले.

शेत मालाला अधिक भाव मिळायला हवा