• साइट नकाशा
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आवाहन

प्रकाशन दिनांक : 13/07/2021

  • पीक विम्याची 15 जुलै, फळपीक विम्यासाठी 14 जुलै अंतिम मुदत

औरंगाबाद, दिनांक 12 (जिमाका):- शेतकऱ्यांनी खरीप पीक आणि डाळिंब, सीताफळ प‍िकांचा विमा अधिकाधिक प्रमाणात काढावा. खरीप पिकांचा विमा भरण्याची  शेवटची तारीख 15 जुलै तर डाळिंब, सीताफळ फळ पिकांची विमा उतरवण्याची 14 जुलै तारीख आहे. शेतकऱ्यांनी हा विमा अधिकाधिक काढावा यासाठी जिल्ह्यातील सीएससी रात्री 10 पर्यंत उघडे राहणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. तसेच विमा संदर्भात शेतकऱ्यांना अडचणी येत असल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांक 1800 2660 700 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री.चव्हाण यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय पीक विमा आढावा बैठक श्री.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिगंबर महाडिक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे जनार्दन जंजाळ, जिल्हा कृषी विकास अधिकारी यांचे प्रतिनिधी डी.आर. भडीकर, एच.डी.एफ.सी.इर्गोचे हरीओम सोळंकी, रामनाथ भिंगारे, बी.एम.जोशी आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, कृषी विभाग, पीक विमा कंपनी यांनी पीक विम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठयाप्रमाणात जनजागृती निर्माण करावी. विम्याबाबत असलेले शेतकऱ्यांचे गैरसमज दूर  करावेत. विमा कंपन्यांबाबतचा  लोकातील विश्वास अधिक दृढ करावा, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीच्या सुरुवातीला श्री.मोटे यांनी  प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2021 व पुर्नरचित हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजनेचे सादरीकरण करुन पीक विम्याबाबत जिल्हाधिकारी चव्हाण यांना सविस्तर माहिती दिली. नैसर्गिक आपत्ती मुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. त्यामुळे पेरणी न होणे, पिकांची उगवण न होणे, काढणी नंतर नुकसान होणे आदीबाबींवर विमा संरक्षण मिळते, असे श्री.मोटे यांनी यावेळी सांगितले.   

या ठिकाणी काढता येणार पीक विमा

कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना त्यांचे खाते असलेल्या व्यापारी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,राष्ट्रीयकृत बँका, आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी  आदी ठिकाणी विमा काढता येतो. त्यासाठी अर्जदाराकडे सातबारा, पेरणीचे स्वयंघोषणापत्र, बँक पास बुक व आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

पीकनिहाय हफ्ता वेगळा

तूर 500 रुपये, बाजरी 440, मक्का 600, सोयाबीन 900, मूग 400, उडीद 400, कापूस दोन हजार 250, खरीप कांदा तीन हजार 250 याप्रमाणे प्रतिहेक्टरी विमा हफ्ता आहे.  

शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आवाहन