शाहिरांची समाज प्रबोधनाची परंपरा महाराष्ट्रासाठी गौरवशाली – नंदकुमार घोडेले
प्रकाशन दिनांक : 27/02/2019
औरंगाबाद, दि.26 (जिमाका) :- पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद नगरीत राज्य शाहिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले याचा आनंद आहे. शाहिरांचे समाज प्रबोधनाचे कार्य महाराष्ट्राला गौरवशाली असल्याचे प्रतिपादन महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले.
रामलीला मैदानावर सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने तीन दिवसीय राज्य शाहिरी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी श्री.घोडेले बोलत होते. यावेळी संचालनालयाच्या संचालक स्वाती काळे, शाहिर हेंमत माळवे, प्रवीण जाधव, मंगलताई दळवी, राजेंद्र राऊत यांची उपस्थिती होती.
महापौर घोडेले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहराची या महोत्सवासाठी निवड केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. छत्रपती शिवरायांच्या आजपासून सुरु असलेल्या शाहिरी कलेला सातासमुद्रापार पोहोचविणारे महाराष्ट्रातील शाहीर आणि त्यांचे कार्य राज्यासाठी गौरवशाली आहे. त्यांच्यामुळेच समाजप्रबोधन होऊन देशासह राज्य प्रगती करत असल्याचेही श्री.घोडेले म्हणाले.
सुरूवातीला दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. मान्यवरांचे स्मृतीचिन्ह, ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले. औरंगाबादचे प्रा.गजानन जाधव यांनी लिहिलेल्या ‘पेशवेकालीन शाहिरी रचना’ या पुस्तकाचे प्रकाशनही श्री.घोडेले यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक श्रीमती काळे यांनी केले. त्यांनी महोत्सव अयोजनामागील भूमिका मांडली. कार्यक्रमानंतर शाहिरांनी शाहिरीचे सादरीकरण केले. सूत्रसंचालन अजिंक्य लिंगायत यांनी केले.
*****
