बंद

शहरातील विविध कार्यालयांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली भेट

प्रकाशन दिनांक : 22/12/2020

औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) :  औरंगाबाद उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, ग्रामीण, अपर तहसील कार्यालय शहर, संजय गांधी निराधार योजना कार्यालय आणि सेतू सुविधा केंद्राची तसेच परिसराला भेट देऊन  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज‍ पाहणी केली.

          औरंगाबाद उपविभागीय अधिकारी कार्यालयात कर्मचा-यांची बैठक व्यवस्था, उपस्थितीबाबत विचारणा श्री.चव्हाण यांनी भेटी दरम्यान केली. तसेच कार्यालयात स्वच्छता ठेवावी, अभिलेख कक्षाची तात्काळ दुरुस्ती करावी. कार्यालयातील दारे, ‍खिडक्या यांची मूळ रुपात आवश्यक ती दुरुस्ती करावी व कार्यालयात स्वच्छ प्रकाश पडेल अशा प्रकारचा रंग देण्यात यावा, अशा सूचनाही श्री. चव्हाण यांनी केल्या.

          तहसिलदार औरंगाबाद ग्रामीण, अपर तहसिलदार औरंगाबाद शहर कर्यालयाच्या पाहणीत कार्यालयीन स्वच्छता, प्रत्येक टेबलवर असलेली कागदपत्रे सुस्थितीत ठेवणे. अभिलेखात नोंदणी करुन जमा करण्याबाबत सूचनाही दिल्या. तहसील कार्यालयाच्या परिसरातील बाहय स्वच्छता तत्काळ करुन घ्यावी, असेही यावेळी संबंधितांना निर्देश दिले. संजय गांधी निराधार योजना कार्यालयासही भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.

          औरंगाबादच्या सेतू सुविधा  केंद्रात भेट देऊन पाहणी केली.  पाहणी दरम्यान सेतू केंद्रात उपस्थित अर्जदार यांच्या समवेत संवाद साधला, अर्जदारांना सेतू केंद्रात योग्य  माहिती मिळते काय, अर्जदाराची अडवणूक होते काय याबाबत देखील उपस्थित अर्जदारांकडून माहिती घेतली. सेतू कार्यालयाच्या कामाची पाहणी करताना स्वत: रहिवासी प्रमाणपत्राचा अर्ज सादर करुन ‍किती वेळात प्रक्रिया पूर्ण होते याची खात्रीही श्री. चव्हाण यांनी केली. अर्जदाराकडून घ्यावयाच्या, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ व जलद करण्याच्या सूचना देताना आवश्यक शुल्कचे दरपत्रक दर्शनी भागावर लावावे, अर्जदारांना बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्था असावी, असेही संबंधितांना श्री. चव्हाण यांनी निर्देश दिले.