बंद

वृक्ष संवर्धनासाठी टेकडी पर्यावरण ग्रुपला सर्वतोपरी मदत करणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 25/10/2021

  • भांगसी माता गडावर जिल्हाधिकारी यांच्याहस्ते वृक्षारोपन

औरंगाबाद, दिनांक 25 (जिमाका) : पूर्वजांनी वृक्ष, पाण्याचे महत्त्व ओळखून वृक्ष लागवड केली, पाण्याच्या बचतीसाठी अनेक उपाययोजना केल्या. त्यांच्या शिकवणीनुसार प्रत्येकाने वृक्ष लागवड, संवर्धन, पाण्याची बचत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. भांगसी माता गड परिसरातील रोपे, वृक्षांच्या संवर्धनासाठी टेकडी पर्यावरण ग्रुपला सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही ते म्हणाले.

शरणापूर येथील भांगसी माता गडावर जिल्हाधिकारी चव्हाण यांच्याहस्ते वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी ध्यान मंदिरात आयोजित कार्यक्रम ते बोलत होते. या प्रसंगी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरी, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, टेकडी ग्रुपचे रुपचंद अग्रवाल, सांडूजी पवार, नवनाथ राजे, प्रकाश भगत आदींची उपस्थिती होती.

वृक्ष लागवड, पाण्याची बचत काळाची गरज आहे. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील गोगा बाबा टेकडी ऑक्सिजन हब करण्याचा संकल्प केलेला आहे. त्यासाठी इको बटालियनच्या माध्यमातून वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे मोठे कार्य करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे भांगसी माता गडही हरित गड, ऑक्स‍िजन हब करण्यासाठी टेकडी पर्यावरण ग्रुपला मदत, सहकार्य करण्यात येईल. टेकडी पर्यावरण ग्रुपमधील बहुतांश सदस्य कामगार आहेत. कंपनीतील काम करून सामाजिक बांधिलकी जपत व निसर्गाचे देणे लागतो या भूमिकेतून वृक्ष लागवड व संवर्धनाचे कार्य मागील आठ वर्षांपासून करत आहेत. ही कौतुकाचीच बाब आहे. समाजातील इतर घटकांनीही या ग्रुपचा आदर्श घेऊन निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन श्री.चव्हाण यांनी केले.

भांगसी माता गडावर अध्यात्म आणि निसर्गाचे नाते पहावयास मिळाल्याने मनस्वी आनंद झाला. याठिकाणी गुरूकुलात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना योगाभ्यास, अध्यात्म ज्ञानाबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञानाची गोडी लावावी, असे आवाहन श्री. परमानंद गिरी महाराज यांना श्री. चव्हाण यांनी केले.

जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक करत भांगसी माता गड व परिसरातील वृक्ष लागवड व संवर्धनासाठी श्री. चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती परमानंद गिरी महाराजांनी केली. टेकडी व परिसरात वृक्ष लागवड, संवर्धनासाठी टेकडी ग्रुपचे मोठ्याप्रमाणात योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले.

सुरूवातीला टेकडीवर जिल्हाधिकारी श्री.चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी श्री. चिलवंत यांच्याहस्ते वृक्षारोपन करण्यात आले. टेकडी पर्यावरण ग्रुपकडून श्री. परमानंद गिरी महाराजांच्याहस्ते श्री. चव्हाण यांचे शाल, श्रीफळ, वृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आले. श्री. चिलवंत यांचेही वृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात श्री.अग्रवाल यांनी टेकडी पर्यावरण ग्रुपचे कार्य आणि टेकडीवर करण्यात येत असलेल्या वृक्ष लागवड, पाणी बचत, स्वच्छतेबाबत माहिती दिली.

कार्यक्रमास माहिती सहायक डॉ. श्याम टरके, बालासाहेब माने, विष्णू सोमसे, अरूण नले, राजेंद्र मोरे, ओमप्रकाश कासनिया, भानुदास सर्वेरया, सदाशीव पाटील, श्रीनाथ बनकर, नीरज राजे, सागर भगत, श्री. राठोड, विवेक जाधव, साहेबराव पवार, मन्मथ भालेराव, शिवम अग्रवाल, रोहिणी माने, कविता राजे, संध्या अग्रवाल, पद्मा भगत, संगीता पवार, वनिता मोरे, राणी नले, पूजा बनकर, निकिता राजे, वैदिक अग्रवाल आदींसह गुरूकुलातील विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती

वृक्ष संवर्धनासाठी टेकडी पर्यावरण ग्रुपला सर्वतोपरी मदत करणार - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण