बंद

विशेष गौरव पुरस्काराबाबत जिल्हा सैनिक कार्यालयाचे आवाहन

प्रकाशन दिनांक : 20/08/2020

औरंगाबाद, दिनांक 20 (जिमाका) : विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना एकरकमी रुपये १० हजार व २५ हजारांचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात येतो, यासाठी आवश्यक कागदपत्रांसह प्राप्त अर्ज संचालक , सैनिक कल्याण विभाग पुणे यांना १६ सप्टेंबरपर्यंत पाठविण्यात येणार आहेत. तरी पात्रता धारकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,औरंगाबाद येथे या पुरस्काराबाबत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी , औरंगाबाद यांनी केले आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत , गायन वादन, नृत्य आदी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे, देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील, अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक, पत्नी , पाल्य आदींना या कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी १० हजार व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी २५ हजारांचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात येतो. याशिवाय शैक्षणिक वर्ष २०१९ -२० मध्ये १० वी व १२ वी बोर्डाच्या परीक्षेत ९० % किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या तसेच पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या व IIT , IIM , AIIMS अशा नामवंत संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठीची प्रकरणे पाठविण्यात येणार आहेत, असेही जिल्हा सैनिक अधिकारी यांनी कळविले आहे.