बंद

विभागीय क्रिडा संकुलात सुरक्षेच्या अत्याधुनिक सुविधा उभारा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 19/01/2022

औरंगाबाद दि 19 (जिमाका): विभागीय क्रिडा संकुलात अनेक खेळाडू सराव करतात तसेच अनेक क्रिडा सामन्यांचे देखील संकुलात आयोजन करण्यात येते. संकुलामध्ये सामान्य नागरिक देखील मॉर्निग वॉकसाठी नियमित येतात. खेळाडू तसेच सामान्य नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विभागीय क्रिडा संकुलात प्रवेशव्दारापासून ते संकुलातील प्रत्येक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक सुविधा उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

          जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज विभागीय क्रिडा संकुल येथे भेट देऊन संकुलाची पाहणी केली आणि सोयी सुविधांचा आढावा घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, क्रिडा उपसंचालक श्रीमती मोराळे, मार्गदर्शक सचिन पुरी आदी उपस्थित होते.  पाहणी दरम्यान श्रीमती मोराळे यांनी संकुलातील सोयी सुविधांची माहिती जिल्हाधिकारी यांना दिली.

 जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, संकुलात प्रवेश करतेवेळी प्रत्येक नागरिकांची आरएफआयडी, आयरीश आणि बायोमॅट्रीक पध्दतीने उपस्थिती लागली पाहिजे. सुरक्षेच्या दृष्टीने हे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक खेळाडू, मार्गदर्शक प्रशिक्षक, सामान्य नागरिक यांची डिजिटली उपस्थिती नोंदली गेली पाहिजे. त्यासाठी ठिकठिकाणी तशी यंत्रणा उभी करावी. संकुलाच्या आवारात आवश्यक तिथे सीसीटिव्ही कॅमेरा बसविण्यासठी तसेच इतर आवश्यक सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

विभागीय क्रिडा संकुलात सुरक्षेच्या अत्याधुनिक सुविधा उभारा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण