बंद

विना मास्क मॉर्निग वॉक करणाऱ्यांना प्रशासनातर्फे सक्त ताकीद: नियमांचे पालन न केल्यास गुन्हा नोंदवणार

प्रकाशन दिनांक : 31/08/2020

  • विद्यापीठ परिसरात प्रशासनातर्फे नागरिकांमध्ये जनजागृती

औरंगाबाद, दि. 30 (जिमाका) :  कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. ह्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी हात वारंवार धुणे, शारीरिक अंतर ठेवण आणि मास्क परिधान करणे ही त्रिसुची अत्यंत महत्वाची आहे. नागरिकांनी दैनंदिन जीवनात ह्या त्रिसुचीचा वापर करावा यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण स्वत: प्रयत्नशील आहेत. याचाच एक भाग म्हणून आज विद्यापीठ परिसरात सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये  या त्रिसुची बाबत जनजागृती केली. तसेच विना मास्क मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना त्यांच्या नावांची नोंद करत सक्त ताकीद देखील देण्यात आली.

यावेळी भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी अनमोल सागर, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे, अपर तहसिलदार किशोर देशमुख आणि पोलिस यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी या पथकाने विद्यापीठ गेटपासुन ते गोगा बाबा टेकडीपर्यंत सर्व नागरिकांशी संवाद साधुन त्यांना त्रिसुचीचे महत्व पटवून दिले. ज्यांनी मास्क परिधान केलेले नव्हते  अशा नागरिकांच्या नावांची नोंद घेऊन त्यांना सक्त ताकीद देण्यात आली आणि यानंतर विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई आणि गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.