बंद

वाहन, बॅनरच्याच परवानगीची मागणी अधिक

प्रकाशन दिनांक : 08/04/2019

औरंगाबाद, दिनांक ०७ (जिमाका) –  लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना प्रचारावर अधिक भर द्यावा लागतो. मतदारांपर्यंत प्रचाराच्या माध्यमातून पोहचावे लागते. यासाठी आदर्श आचारसंहितेचे पालन अत्यावश्यक असते. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून आवश्यक परवानगी घ्यावी लागते. अशाच परवानगीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या एक खिडकी कक्षात निवडणूक प्रचारासाठी वाहन, वाहनांवर बॅनर, झेंडा,पताका, वाहनांचे आधुनिकीकरणासाठी  देण्यात आलेल्या आहेत.

उमेदवारांना प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, या दृ्ष्टीकोनातून सिंगल विंडो (एक खिडकी) कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामध्ये चौक सभा, जाहीर सभा, सभेसाठी मनपाचे नाहरकत प्रमाणपत्र, तात्पुरत्या प्रचार कार्यालयाची परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र्, ध्वनीक्षेपक, मिरवणुका, रोड शो, रॅली, खासगी विमान, हेलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी, खासगी जागेवर जाहिरात फलक, सभेच्या ठिकाणी पोस्टर्स, झेंडे लावणे आदी परवानग्या या एकाच ठिकाणी देण्यात येत आहेत.

या परवानग्या मनपा, पोलिस, निवासी उपजिल्हाधिकारी, विमान सेवा प्राधिकरण, नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत, मनपा, प्रादेशिक परिवहन अधिकारी  आदी कार्यालयाशी संबंधित आहेत. या परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने उमेदवारांचा वेळ, श्रमही वाचण्यास मदत होत आहे. या परवानग्यामध्ये सर्वाधिक परवानगी या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रचार वाहन परवानगी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत प्रत्येकी ७१ आणि ५१ परवानग्या देण्यात आलेल्या आहेत. कक्ष स्थापनेपासून दहा दिवसांत १९५ परवानगींची मागणी करण्यात आलेली आहे. त्यापैकी १७० परवानगी देण्यात आलेल्या आहेत. तर उर्वरीत आवश्यक परवानगीबाबतची कार्यवाही सुरू आहे.

****