बंद

वाढीव संसर्गाचे गांभिर्य ओळखुन जनतेने खबरदारी घ्यावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 08/03/2021

  • चाचण्यांचे प्रमाण वाढवावे
  • खासगी आस्थापनातील लोकांना दर 15 दिवसांनी कोरोना चाचणी बंधनकारक

औरंगाबाद, दि.07, (जिमाका) :- औरंगाबादसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही कोरोना बाधीतांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या संसर्गाला वेळीच आळा घालण्यासाठी वाढीव स्वरूपात उपचार सुविधांसह चाचण्यांची सुविधा सज्ज ठेवण्याचे सूचित करून वाढीव संसर्गाचे गांभिर्य ओळखुन जनतेने खबरदारी घ्यावी, यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जिल्हा कृतीदलाची (टास्क फोर्स) तातडीची बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी श्री. चव्हाण बोलत होते. बैठकीस पोलीस आयुक्त निखील गुप्ता, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, अन्न औषध प्रशासनाचे सहसंचालक संजय काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेळके यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते.

बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सर्व यंत्रणांकडून जिल्ह्यातील वाढत्या रूग्णसंख्येबाबत माहिती घेत उपलब्ध उपचार सुविधा, नागरीकांकडून कोविड नियमावलींचे पालन, संसर्गाचे स्वरूप, मृत्यूचे प्रमाण यासह इतर बाबींची माहिती घेतली. त्यावर सविस्तर चर्चा करून वाढता संसर्ग वेळीच आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने जनतेने अधिक खबरदारीने कोविड नियमावलींचे पालन करणे गरजेचे असून अंशत: लॉकडाऊन करून वाढती रूग्णसंख्या नियंत्रणात आणण्याचे ठरवण्यात आले. तसेच सर्व खासगी आस्थापनांना दर 15 दिवसांनी कोविड चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले.

श्री. चव्हाण यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील संसर्गाचे प्रमाण बदलते असून संसर्गामध्ये कुटुंबच्या कुटुंबे बाधित होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढत आहे. त्यादृष्टीने वाढीव चाचण्यांची सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देशित करून श्री. चव्हाण म्हणाले, गेल्या वर्षभरापासून कोविड -19 आपत्तीचा प्रशासन यशस्वीरित्या सामना करत असून आजघडीला जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपचार सुविधा सज्ज आहे. मात्र याच गतीने संसर्ग वाढल्यास वाढीव रूग्णसंख्येच्या प्रमाणात उपचार सुविधा उपलब्ध करून देणे जिकरीचे ठरू शकते. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी वेळीच नागरीकांनी खबरदारी घेत हात धुणे, मास्कचा योग्य वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतराचे पालन या नियमांचे कटाक्षाने पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुर्ण लॉकडाऊनचा निर्णय नाईलाजाने प्रशासनास घ्यावा लागेल, अशी वेळी येऊ नये आणि सुरळीतपणे सर्व दैनंदिन व्यवहार, रोजगार सुरू राहण्याच्या दृष्टीने सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने यंत्रणांनी प्रभावीरित्या जनजागृती, प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. वाढीव प्रमाणात औषधसाठा, व्हेंटीलेटर, ऑक्सीजन, अतिरिक्त खाटांसह उपचार सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधितांना दिल्या.

पोलीस आयुक्त श्री. गुप्ता यांनी नागरीकांनी कोणत्याही प्रकारची हलगर्जी न करता ताप, सर्दी किंवा इतर दुखणे असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेऊ नये. तर तातडीने कोरोना चाचणी करणे गरजेचे असून त्याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचे सूचित केले. त्याचप्रमाणे औषधालये आणि इतर सर्व आस्थापनांनी आपल्या येथे कार्यरत सर्वांची दर 15 दिवसांनी कोरोना चाचणी करून तसा अहवाल सादर करावा. तसेच या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत सूचित केले.

तसेच बाजारपेठा, आठवडे बाजार, लग्न व इतर कार्यक्रम या ठिकाणच्या गर्दीव्दारे संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी या गोष्टींवर निर्बंध आणणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने अंशत: काही बाबी बंद करून परिस्थितीत सुधारणा होते का हे पाहणे योग्य ठरेल, या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी सर्व उपस्थितांशी सविस्तर चर्चा केली.

वाढीव संसर्गाचे गांभिर्य ओळखुन जनतेने खबरदारी घ्यावी