बंद

वाढीव उपचार सुविधांसह यंत्रणांनी सज्ज रहावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 15/03/2021

  •  बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या वाढवाव्या
  •  लसीकरण मोहीमेच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाठपुरवा करावा

 

औरंगाबाद दि, 15 (जिमाका):-जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असून या आपत्तीचा यशस्वी सामना करण्यासाठी सर्व वाढीव उपचार सुविधांसह यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविड संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय, लसीकरण मोहीमेच्या आढावा बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा परषिदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, मनपा अतिरिक्त आयुक्त बी. नेमाने, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ, अन्न औषध प्रशासनाचे सहसंचालक संजय काळे, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. शेळके, उपविभागीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह इतर संबंधित उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी शहरी भागासह गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागातही संसर्ग वाढत असून ज्या गावांमध्ये रूग्णसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, संबंधित आरोग्य अधिकारी या सर्वांनी एकत्रित प्रयत्नांतून तातडीने संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देशित केले. तसेच सर्व संबंधित यंत्रणा प्रमुखांनी प्रत्यक्ष पाहणी करून संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना, प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. कन्नड, पैठण, सिल्लोडसह अन्य तालुक्यात ज्या ठिकाणी संसर्ग वाढतो आहे, त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांनी अधिनस्त पथकाकडून प्रभावीरित्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नात वाढ करून बाधीत संपर्कातील व्यक्तींच्या वाढीव प्रमाणात चाचण्या कराव्यात. त्यासाठी शिक्षक, आशा सेविकांच्या पथकाव्दारे सर्वेक्षण, जनजागृती करावी. गावांमध्ये ग्रामसेवक, सरपंच, ग्राम दक्षता समीतीच्या सहाय्याने व्यापक जनजागृती करून रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची शोध घेऊन चाचण्या कराव्यात. त्याचप्रमाणे लसीकरणासाठी लोकांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊन लसीमुळे प्राप्त होणारे सुरक्षा फायदे याबाबत माहिती देऊन लसीकरण मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्याचे निर्देश श्री. चव्हाण यांनी संबंधितांना दिले.

तसेच जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत मोठ्या प्रमाणात उपचार सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व उपचार सुविधा मनुष्यबळ, आवश्यक साधन सामुग्रीसह सज्ज ठेवाव्यात. पूर्वीचे सर्व कोविड केअर सेंटर वाढीव रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तयार ठेवावेत. त्याचप्रमाणे 51 प्राथमिक आरोग्य केंद्रावर ग्रामीण भागात रविवार व्यतिरिक्त सर्व दिवशी लसीकरण सुरू आहे, त्याबाबत जनजागृती करून लसीकरणात लोकांचा सहभाग वाढवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

त्याचप्रमाणे ज्या खासगी रूगणालयांनी लसीकरणाची परवानगी मागितलेली आहे त्यांच्या रूग्णालयांची लस साठवणूक क्षमता, इतर पूरक बाबींची पाहणी करून त्यांना कोरोना लसीकरणाची परवानगी देण्याची कार्यवाही करण्याबाबतही श्री. चव्हाण यांनी सूचित केले.

यावेळी डॉ. गोंदावले यांनी सर्व आरोग्य अधिकारी यांनी स्थानिक यंत्रणा, सरपंच, ग्रामस्थ यांचे सहकार्य घेऊन तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सक्रीय होण्याचे सूचति केले.

वाढीव उपचार सुविधांसह यंत्रणांनी सज्ज रहावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण