बंद

वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमिवर उपचार सुविधा सज्ज ठेवाव्यात – प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे

प्रकाशन दिनांक : 23/02/2021

  • प्रशासनासह नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे

औरंगाबाद, दि. 22 (जिमाका) : राज्यात आणि जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता सर्वत्र वर्तवली जात असून त्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील सर्व उपचार सुविधा पूरेशा मनुष्यबळासह सज्ज ठेवण्याचे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी आज येथे संबंधितांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजना, लसीकरणा संदर्भातील आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी श्री. गव्हाणे यांनी यंत्रणांना निर्देशित केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, पोलीस उपायुक्त मीना मकवाना, मनपा अतिरिक्त आयुक्त बी. नेमाने, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. ज्योती बजाज, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस शेळके, लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. नांदापूरकर, यांच्यासह सर्व यंत्रणा प्रमुख, संबंधित उपस्थित होते.

प्र. जिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे यांनी जिल्ह्यातील वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी अधिक खबरदारी बाळगत चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे निर्देशित केले. तसेच जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर, डिसीएच यासह सर्व उपचार सुविधा मनुष्यबळ, औषधोपचार साधन सामुग्री सज्ज ठेवण्याचे सूचित करून श्री. गव्हाणे यांनी यावेळी संसर्ग हा पुर्वीपेक्षा अधिक गतीने वाढत असल्याने अधिक खबरदारीपुर्वक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. गर्दीवर नियंत्रण ठेवत मास्क वापर कोविड नियमावलीचे अधिक प्रभावी पालन करण्याच्या दृष्टीने जनजागृती करावी. मास्क वापर न करणाऱ्यांवर आवश्यकते दंडात्मक कारवाई करावी. परिस्थिती नियंत्रणात ठेवत वाढता संसर्ग रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवण्याचे आणि सर्व यंत्रणांनी समन्वयपूर्वक काम करण्याच्या सूचना श्री. गव्हाणे यांनी यावेळी दिल्या.

डॉ. गोंदावले यांनी चाचण्यांचे प्रमाण वाढवत असताना आरटीपीसीआर चाचणीचा आहवाल येईपर्यंत संबंधिताला घरातच विलगीकरणात राहणे बंधनकारक असून या बाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशित केले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील वाढता संसर्ग रोखणे आणि मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. त्यादृष्टीने सर्वांनी पुर्वानुभवासह आणि समन्वयपूर्वक ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सतर्कता बाळगावी. ज्या ठिकाणी जास्त रूग्णसंख्या आहे त्या ठिकाणी अधिक कडक नियमांचे पालन करावे. जिल्ह्यात औरंगाबाद, वैजापूर, गंगापूर, कन्नड या चार तालुक्यात सध्या रूग्णसंख्या अधिक प्रमाणात वाढत असून त्या ठिकाणी कॉनटॅक्ट ट्रेसिंग वाढवावे, असे सूचित केले.

यावेळी डॉ. येळीकर, डॉ. पाडळकर, डॉ. कुलकर्णी, यांनी संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजना, तयारी याबाबत माहिती दिली. डॉ. वाघ यांनी जिल्ह्यातील लसीकरण प्रक्रियेबाबत माहिती दिली.

वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमिवर उपचार सुविधा सज्ज ठेवाव्यात