वाढता संसर्ग वेळीच रोखण्यासाठी नागरीकांनी अधिक जबाबदारीने वागणे गरजेचे – पालकमंत्री सुभाष देसाई
प्रकाशन दिनांक : 01/03/2021
- सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क नसलेल्यांना प्रवेश बंदी करावी
- संसर्गाचा वाढता धोका ओळखून ‘मी जबाबदार’ ही जाणीव ठेवावी
औरंगाबाद,दिनांक.26 (जिमाका): कोरेानाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज आहेत. त्यासोबतच नागरिकांनीही वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन अधिक जबाबदारीने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने जनतेने मास्कसह संसंर्ग रोखण्यासाठीच्या नियमांचे पालन अधिक कटाक्षाने करावे, असे आवाहन उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.
हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आयोजित जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस आ. अंबादास दानवे, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य आधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेळके यांच्यासह सर्व संबंधित उपस्थित होते.
यावेळी श्री. देसाई यांनी जिल्ह्यातील वाढत्या संसर्गाची माहिती घेत यंत्रणांना सर्तक राहण्याचे निर्देशित करत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात मास्कचा वापर, गर्दी टाळणे या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अधिक प्रभावीरित्या उपाययोजना करण्याचे सूचित केले. जेणेकरुन वेळीच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणणे शक्य होईल. अन्यथा संसर्ग रोखणे आवाक्याबाहेर जाईल. त्यामुळे‘ मी जबाबदार’ याचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने रात्रीची संचार बंदीची वेळ गरजेनुसार वाढवण्याबाबत तसेच लग्न, कार्यक्रम, समारंभ येथे पाहणी पथकाने गर्दीवर नियंत्रण मास्क वापराची पाहणी करावी, तसेच आवश्यक तिथे दंडात्मक कारवाई करुन जनतेकडून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे कटाक्षाने पालन करुन घ्यावे, असे पालकमंत्री यांनी सूचीत केले.
तसेच शासकीय व खाजगी सर्व आरोग्य यंत्रणांनी वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तातडीने पूरेशा प्रमाणात उपचार सुविधा सज्ज ठेवाव्यात. संसर्ग वेळीच रोखण्यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. यंत्रणांनी अधिक सर्तकतेने प्रतिबंधात्मक उपाय योजनासाठी तयार रहावे. ऑक्सीजन, व्हेंटीलेटर यासह सर्व आवश्यक उपचार सुविधांची उपलब्धता मुबलक प्रमाणात ठेवावी, असे निर्देशित करुन पालकमंत्री यांनी शासकीय तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी विना मास्क असलेल्यांना प्रवेशबंदी याप्रमाणे मास्कचा वापर बंधनकारक करावा. मॉल, भाजीमंडई, बाजारपेठा यासह इतर गर्दीच्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवावे. जनतेनेही गाफील न राहता दुसऱ्या लाटेच्या संसर्गाची जोखीम लक्षात घेऊन खबरदारी बाळगावी.
यावेळी पोलीस आयुक्त श्री. गुप्ता यांनी संसर्ग आटोक्यात ठेवण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनामार्फत कलम 144 अतंर्गत प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरु करण्यात आली असून रात्री 11 ते 6 यावेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी कारवाई सुरु असून आवश्यकतेनुसार निर्बंध अधिक कडक करण्यात येतील असे सांगितले. मनपा आयुक्त श्री. पांडेय यांनी आतापर्यत 4 लाख पेक्षा अधिक लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून शहरातील सर्व कोविड केअर सेंटर सूविधा सज्ज ठेवण्यात आल्या असून मेल्ट्रॉन आणि एमआयटी येथील उपचार सुविधा सुरु करत असल्याचे सांगून मनपाचे 38 पाहणी पथके नियमितपणे गर्दीवर नियंत्रण व मास्क वापराबाबत कारवाई करत असल्याचे सांगितले.
प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे म्हणाले, जिल्ह्यात वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रति रुग्ण संपर्क चाचण्या वाढवण्यात आल्या असून विभागीय आयुक्तालय, मनपा, पोलिस आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी संशयित अभ्यागतांची प्रवेशपूर्व कोरोना चाचणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वेळीच आढळून येत आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर वाढता असल्याचे सांगून श्री. गव्हाणे यांनी संसर्गाच्या वाढत्या प्रमाणावर प्रशासन सर्तकतेने लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यात 115 उपचार सुविधा तयार असून मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन उपलब्धता व इतर आवश्यक उपाययोजना सज्ज असल्याचे श्री. गव्हाणे यांनी सांगितले. तसेच प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर सुविधा उपलब्ध असल्याचे सांगत तसेच जिल्ह्यात 45 टक्के कोरोना लसीकरण मोहिम पूर्ण झाली असून सध्या लस घेण्याकडे लोकांचा कल वाढत असल्याचेही सांगितले.
यावेळी शहरातील खाजगी रुग्णालयांच्या प्रमुख डॉक्टरांसोबत चर्चा करुन पालकमंत्र्यांनी वाढत्या संसर्गाच्या परिस्थितीत उपचार सुविधासह सज्ज राहण्याचे संबंधितांना सूचीत करुन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासंदर्भातही चर्चा केली.
शेतमाल प्रक्रिया उद्योग वाढीचे नियोजन करा शेतकरी समृध्द झाला पाहिजे हे शासनाचे ध्येय आहे. त्यासाठी शेत मालावरील प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठीचे नियोजन व त्याचबरोबर त्या उद्योगाशी निगडीत योग्य मार्गदर्शन प्रशिक्षण देण्याबाबत नियोज करण्याचे निर्देश आज पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधितांना दिले. जिल्ह्यातील कृषी संबंधीत आयोजित बैठकीत श्री. देसाई बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, कृषी अधिक्षक अधिकारी डॉ. तुकाराम मोटे उपस्थित होते. यावेळी श्री. देसाई म्हणाले की शेतकऱ्यांनी समृध्द होण्यासाठी व त्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी आवश्यक बाजारपेठ उपलब्धतेबाबत माहिती मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी केवळ शेतमाल पिकविण्या बरोबरच त्यावर प्रक्रिया करुन माल विकल्यास त्याचा शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळेल. त्याच बरोबर‘ विकेल ते पिकेल’ या योजनेची व्यापक अंमलबजावणी करावी. शेतमाल प्रक्रिया उद्योग विस्तारण्यासाठी कृषी विभागातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन,प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. असेच जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्तीगत कांदा चाळ निर्माण करण्यासाठी लक्ष ठरवून नियोजन करण्याची सूचना कृषी विभागास केली. यावेळी श्री देसाई म्हणाले की जिल्ह्यात मका पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. या मक्यावर उद्योग प्रक्रीया राबविल्यास शेतकऱ्यांना लाभ होऊन आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल याबाबतही नियोजन करण्याची सूचना संबंधितांना श्री. देसाई यांनी केली. |