लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
प्रकाशन दिनांक : 09/09/2020
औरंगाबाद, दि.09 (जिमाका) :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) औरंगाबाद जिल्हा कार्यालयामार्फत बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झाले असुन सदर उद्दिष्ट पुर्तीसाठी मातंग समाजातील इच्छुक अर्जदारांकडेन कर्ज मागणी अर्ज मागविण्यात येत आहे, असे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.
अनुदान योजने अंतर्गत (प्रकल्प मर्यादा 50000/-) लाभ घेणाऱ्या मातंग समाजातील इच्छुक अर्जदार ज्याचे वय 18 पेक्षा जास्त व 50 वर्षापेक्षा कमी तसेच यापूर्वी महामंडळाच्या कोणतेही योजनेअंतर्गत लाभ घेतलेले नाही, अशा अर्जदारांनी योजनेचे कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यातील झेरॉक्स, हस्तलिखित, टंकलिखित केलेला कर्ज मागणी अर्ज 15 सप्टेंबर पासून 14 ऑक्टोबर 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सादर करावे. कर्ज मागणी अर्जाचा नमुना www.slasdc.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
तसेच अनुदान कर्ज मागणी अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड झेरॉक्स, रेशन कार्डची झेरॉक्स प्रत, व्यवसायाचे दर पत्रक (कोटेशन), दोन पासपोर्ट साईज फोटो, रहिवाशी प्रमाणपत्र इत्यादी प्रकरणासोबतची सर्व कागदपत्रे, प्रमाणपत्रे स्वत:च्या स्वाक्षरीने सांक्षांकित करावीत. प्रस्ताव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) औरंगाबाद, जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवाजी हायस्कुलच्या बाजूला, खोकडपुरा, औरंगाबाद या ठिकाणी स्वीकारले जातील, असेही त्यांनी कळविले आहे.